250 कोटी खर्चाचे 220 के.व्ही. वीज उपकेंद्राच्या उभारणीचे भूमिपूजन
बेळगाव : बेळगाव शहराचा विकास झपाट्याने होत आहे. उद्योग, गृहनिर्माण यासह सर्वच बाबतीत विकास होत आहे. यासह सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे सार्वजनिक बांधकाम आणि बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
शहरातील मच्छे वीज वितरण केंद्राच्या आवारात सोमवारी (7 ऑगस्ट) 260 कोटी रुपये खर्चून 220 के.व्ही. वीज वितरण केंद्र आणि अनेक वीज पारेषण लाईनच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते.
आंतरराष्ट्रीय विमानतळासह अनेक कामे करायची आहेत. पक्षभेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन काम केल्यास बेळगावचा सर्वांगीण विकास शक्य होईल. याबाबत शासन सर्व प्रकारची मदत करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
दर्जेदार वीज पुरवठ्याची सुविधा
या भागातील उद्योजकांच्या अनेक दिवसांच्या मागणीनुसार 220 के.व्ही. नवीन वीज केंद्र बांधले जात आहे. उद्योगांना दर्जेदार आणि सतत वीजपुरवठा आवश्यक असल्याने हे केंद्र फायदेशीर ठरणार आहे.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, हे काम लवकरात लवकर पूर्ण करून उद्योगांना वीज पुरवठा करण्यात यावा.
सध्याच्या जागेत 220 के.व्ही. केंद्राचे बांधकाम सुरू आहे, 39 किमी. लांब मल्टिपल ट्रान्समिशन लाईन बांधण्याचे प्रस्तावित आहे. 250 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे. या भागातील उद्योगांना दर्जेदार वीजपुरवठा करणे सोयीचे होणार आहे.
अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, या वीज केंद्राच्या उभारणीतून उद्योगांना चालना मिळणार आहे. येत्या काही दिवसांत 400 के.व्ही. पॉवर स्टेशन आवश्यक आहे आणि त्यासाठी योग्य जागा शोधणे आवश्यक आहे. त्याची अंमलबजावणी या सरकारमध्ये होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी आमदार आसिफ (राजू) सेठ, जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्यासह हेस्कॉमचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta