बेळगाव : मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार, हरियाणातील जातीय हिंसाचार, वाढते सायबर गुन्हे, महागाई आणि रोजगार हमी योजनेतील भ्रष्टाचार याच्या विरोधात नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनच्या वतीनं बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मणिपूर येथे दोन जमातींमधील संघर्षात महिलांची काढलेली निर्वस्त्र धिंड, तेथील हिंसाचार, हरियाणातील मेवात व अन्य ठिकाणी दोन जातींमधील हिंसाचार, अश्लील, व्हिडिओ, सोशल पोस्ट्सच्या माध्यमातून युवती व महिलांची केली जाणारी बदनामी, वाढती महागाई आणि महात्मा गांधी नरेगा योजनेतील भ्रष्टाचाराचा राष्ट्रीय भारतीय महिला महासंघाने निषेध केला आहे. आज याच्या विरोधात महासंघातर्फे बेळगावात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात महिलांनी जोरदार निदर्शने केली.
यावेळी हिंसाचाराच्या आणि सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रीय भारतीय महिला महासंघाच्या कायदा सल्लागार मनीषा माने म्हणाल्या की, मणिपूरमधील हिंसाचारावेळी दोन महिलांची हिंसक जमावाने निर्वस्त्र धिंड काढून त्यांच्यावर बलात्कार केला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी आणि देशाची मान शरमेने खाली घालायला लावणारी आहे. या घटनेतील दोषींना कठोरात कठोर मरेपर्यंत फाशी दिली पाहिजे. त्याचप्रमाणे महिलांचे फोटो, व्हिडिओ काढून त्यांना बदनाम करणारे सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलावीत. हरियाणातील दोन जातींमधील हिंसाचार रोखावा, वाढत्या महागाईने सामान्य जनता त्रासली आहे. त्यामुळे दरवाढ कमी करावी, रोजगार हमी योजनेत लाभार्थ्यांची नावे यादीत असून देखील त्यांना वेतन दिले जात नाही. हा भ्रष्टाचार रोखावा अशा आमच्या मागण्या आहेत. त्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारला निवेदन देण्यासाठी आम्ही येथे जमलो आहोत असे सांगितले.
यावेळी बोलताना महिला महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या मीरा मादार यांनी सांगितले की, मणिपूरमधील महिलांवरील अत्याचारामुळे देशाची प्रतिमा डागाळली आहे. यावर गप्प बसून चालणार नाही. सर्वांनी याविरोधात आवाज उठवला पाहिजे. वाढत्या महागाईमुळे हातावरच्या पोटावर असलेल्या गोरगरीब लोकांना चटके सोसावे लागत आहेत. त्यामुळे सरकारने त्वरित महागाई कमी करावी, हिंसाचारात दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली. यानंतर जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वूमेनच्या अध्यक्षा कला सातेरी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात उपाध्यक्षा उमादेवी माने, सचिव कला कर्लेकर, शोभा खनगावी, जुलेखा बाळेकुंद्री यांच्यासह फेडरेशनच्या पदाधिकारी व सदस्यानी भाग घेतला.