Saturday , July 27 2024
Breaking News

माजी आम. कुडची पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल

Spread the love

बेळगाव : बेळगावचे माजी आमदार रमेश कुडची यांनी रायबाग येथे झालेल्या एका मेळाव्यामध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला आहे. याप्रकारे काँग्रेसमधून निजदमध्ये गेलेले कुडची आता पुन्हा काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत.
रायबाग येथे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित मेळाव्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी आदी नेत्यांच्या उपस्थितीत माजी आमदार रमेश कुडची यांनी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश केला. यावेळी उपस्थित काँग्रेस नेते मंडळींनी त्यांचे स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कुडची यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे आगामी विधान परिषद व 2023 मधील विधानसभा निवडणुकीत त्यांच्याकडे महत्वाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीकडून रमेश कुडची बेळगावचे महापौर झाले होते. तथापि 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून बेळगाव मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढविली. त्यावेळी पहिल्यांदाच समितीला पराभव पत्करावा लागला होता आणि त्याची राज्यभरात चर्चा झाली होती. त्यानंतर 2004 मधील निवडणूक पुन्हा जिंकून ते बेळगावात काँग्रेसकडून विधानसभेवर निवडून गेले. मात्र 2004 ते 2008 या काळात काँग्रेसमधीलच काहींनी त्यांच्याविरोधात मोर्चेबांधणी केली. 2008 मध्ये बेळगाव उत्तर हा नवा मतदारसंघ तयार झाला. त्या मतदारसंघातून त्यांना उमेदवारी हवी होती. तथापि पक्षाने फिरोज सेठ यांना उमेदवारी दिल्यामुळे कुडची यांनी निधर्मी जनता दलाकडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पुढे 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजप उमेदवार सुरेश अंगडी यांचा प्रचार केला. त्यामुळे ते काँग्रेसपासून दुरावले होते. आता रमेश कुडची यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *