
बेळगाव : मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी शेतकरी बचाव पॅनेलच्या उमेदवारांनी शुक्रवारी (दि. २५) विविध गावांत प्रचार केला. त्यानंतर म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांची भेट घेण्यात आली. यावेळी कोंडुसकर यांनी कारखान्याच्या हितासाठी शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मतदान करावे, असे आवाहन केले.
तानाजी पाटील आणि आर. आय. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बचाव पॅनेलच्या सर्व उमेदवार आणि समर्थकांनी शुक्रवारी सकाळी कडोली, कंग्राळी, काकती, होनगा, शाहुनगर, वडगाव, मजगाव, नंदिहळ्ळी परिसरात मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. कारखाना भांडवलदारांना लीजवर देऊन शेतकऱ्यांचा हक्क संपवण्याचा प्रयत्न होत आहे. या प्रयत्नांना थांबविण्यासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत. शेतकऱ्यांचा कारखाना शेतकऱ्यांकडेच राहिला पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्यामुळे मतदारांनी शेतकरी बचाव पॅनेलला भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले.
संध्याकाळी रमाकांत कोंडुसकर यांची भेट घेऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले. शेतकरी बचाव पॅनेलमध्ये कारखान्याच्या हितासाठी काम करणारे लोक आहेत. त्यामुळे, मतदारांनी आता विचारपूर्वक मतदान करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन केले. यावेळी उमेदवार आर. आय. पाटील, मल्लाप्पा पाटील, लक्ष्मण नाईक, भाऊराव पाटील, बाबुराव भेकणे, जोतिबा आंबोळकर, परशराम कोलकार, शिवाजी कुट्रे, वैष्णवी मुळीक यांच्यासह सुरेश अगसगेकर, आर. के. पाटील, जयराम पाटील आदी उपस्थित होते.
तानाजी पाटील, युवराज हुलजी, सुनील अष्टेकर, बसवराज गाणीगेर यांच्यासह शिवाजी सुंठकर, निंगाप्पा जाधव, एस. एल. चौगुले, पुंडलिक पावशे, नारायण सांगावकर आदींनी विविध गावांत प्रचार केला.
Belgaum Varta Belgaum Varta