बेळगाव : बेंगलोर येथे नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य खुल्या अजिंक्यपद क्रीडा महोत्सवातील महिलांच्या खो-खो स्पर्धेचे अजिंक्यपद बेळगाव जिल्हा संघाने हस्तगत केले, तर पुरुष संघाने उपविजेतेपद मिळविले.
कर्नाटक राज्य अमॅच्युअर खो-खो फाउंडेशनतर्फे बेंगलोर येथे आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय स्पर्धेत बेळगाव जिल्हा अमॅच्युअर खो-खो संघटनेच्या पुरुष व महिला संघांचा सहभाग होता. स्पर्धेत चमकदार कामगिरी नोंदविताना पुरुष संघाने उपविजेतेपद तर महिला संघाने अजिंक्यपद मिळविले. बेळगावच्या महिला संघाच्या विजयात समाज शिक्षण संस्था संचलित महाराष्ट्र हायस्कूल येळ्ळूरच्या रसिका प्रभाकर कंग्राळकर, प्रणाली रामचंद्र बिजगरकर, सानिका प्रभाकर चिठ्ठी आणि संजना बसवंत चिट्ठी या खेळाडूंनी मोलाचा वाटा उचलला. अष्टपैलू खेळ करून सुवर्ण पदकाच्या मानकरी ठरलेल्या या खेळाडूंचे हायस्कूलतर्फे अभिनंदन करून कौतुक केले गेले.
सदर खेळाडूंना समाज शिक्षण संस्थेच्या पदाधिकार्यांसह महाराष्ट्र हायस्कूलचे मुख्याध्यापक बी. पी. कानशिडे तसेच इतर शिक्षक व कर्मचारीवर्गाचे प्रोत्साहन आणि क्रीडाशिक्षक वाय. सी. गोरल यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
