बेळगाव : लेडीज क्लब बेळगावतर्फे शहरातील माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील मुलींना मोफत सॅनिटरी नॅपकिन आणि मुलांच्या नि:शुल्क केशकर्तनाचा स्तुत्य उपक्रम नुकताच यशस्वीरित्या राबविण्यात आला.
सामाजिक गरजांपासून वंचित असलेल्यांसाठी कांहीतरी करण्याच्या उद्देशाने लेडीज क्लबने हा उपक्रम राबविला. क्लबतर्फे माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेतील सुमारे 30 विद्यार्थिनींना प्रत्येकी दोन पाकीट सॅनिटरी नॅपकिनचे वितरण करण्यात आले. त्याप्रमाणे शाळेतील 90 विद्यार्थ्यांचे केशकर्तन करण्यात आले. मुंबई येथील प्रशिक्षित हेअर ड्रेसर रामण देवधर आणि त्यांच्या सहकार्यांनी मुलांचे केस नि:शुल्क कापून त्यांना टापटीप केले. या उपक्रमामुळे माहेश्वरी शाळेतील मुला-मुलींच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
लेडीज क्लब बेळगावच्या अध्यक्षा मैत्रयी आदित्य बिश्वास यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त आदर्शवत उपक्रम राबविला गेला. याप्रसंगी कन्नड व संस्कृती खात्याच्या विद्यावती बजंत्री, सामाजिक कार्यकर्ते किरण निप्पाणीकर, माहेश्वरी अंध मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता गावडे, संस्थेचे सचिव आणि लेडीज क्लबच्या अन्य सदस्य तसेच शाळेचा शिक्षक वर्ग उपस्थित होता.
