
खानापूर : खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटना, धार्मिक संस्था, सामाजिक संघटना तसेच नागरिकांच्या वतीने हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर अवैध गोहत्या रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी करत याबाबत कर्नाटकचे गृहमंत्री जी परमेश्वर तसेच बेळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक यांना खानापूरचे तहसीलदार मार्फत निवेदन सादर करण्यात आले.
सुरुवातीला राजा शिवछत्रपती चौकात रास्ता रोको करण्यात आला. त्यानंतर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी गो हत्येचा निषेध करणाऱ्या घोषणा देण्यात येत होत्या. सुरुवातीला प्रास्ताविक व स्वागत भाजपाचे प्रधान कार्यदर्शी मल्लाप्पा मारीहाळ यांनी केले. त्यानंतर बजरंग दलचे खानापूर तालुकाप्रमुख नंदकुमार नीट्टूरकर, खानापूर तालुका विकास आघाडीचे संस्थापक व तालुकाध्यक्ष भरमाणी पाटील, राज्य वननिगमचे माजी सदस्य व भाजपा बेळगाव ग्रामीणचे प्रभारी सुरेश देसाई, भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सुनीता पाटील, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, भाजपा तालुका उपाध्यक्ष एडवोकेट चेतन मनेरिकर, भाजपा तालुका अध्यक्ष बसवराज सानिकोप, मोर्चाचे आयोजक हिंदुत्ववादी नेते पंडित ओगले, भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव देसाई यांची गोहत्येचा निषेध करणारी व तालुक्यात गोहत्या बंद करण्याबाबत व संबंधितावर कठोर कारवाई करण्याबाबत भाषणे झाली. यानंतर खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कर्नाटक सरकारने लागू केलेल्या कर्नाटक प्रिव्हेन्शन ऑफ स्लॉटर अँड प्रिझर्वेशन ऑफ कॅटल ॲक्ट 2020 अंतर्गत गायी, वासरे व प्रतिबंधित जनावरांच्या कत्तलीवर बंदी घालण्यात आली असून, अशा प्रकारच्या अवैध वाहतूक, विक्री व कत्तलीस कायद्यानुसार शिक्षेची तरतूद आहे. परंतु, बकरी ईद काळात काही समाजकंटकांकडून खानापूर तालुक्यात अवैध जनावरांची वाहतूक व गोहत्या मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा घटनांमुळे हिंदू समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या जाऊ शकतात तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यासाठी प्रशासनाने अशा लोकांवर सक्त कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रशासनाकडे खालील प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत :
* खानापूर तालुक्यातील प्रमुख रस्ते व सीमावर्ती भागात विशेष पोलिस तपासणी नाके उभारावेत.
* तालुक्यात कुठेही अवैध जनावर बाजार किंवा अनधिकृत कत्तल सुरू होणार नाही याची दक्षता घ्यावी.
* बकरी ईद दरम्यान गायी, वासरे व प्रतिबंधित जनावरांच्या अवैध कत्तलीवर कडक बंदी घालावी.
* कत्तलखाने, जनावरांची वाहतूक मार्ग, साप्ताहिक बाजारपेठा व संशयित ठिकाणी विशेष तपासणी व धाडी टाकाव्यात.
* कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी कारवाई करावी.
* सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहून गस्त वाढविण्याच्या सूचना द्याव्यात.
* सामाजिक सलोखा व शांतता अबाधित राहण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करावी.
या निवेदनावर पंडित ओगले यांच्यासह खानापूर तालुक्यातील विविध हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मण बामणे, तालुका पंचायतीचे माजी सदस्य अशोक देसाई, इदलहोंड पीकेपीएसचे अध्यक्ष चांगाप्पा बाचोळकर, राजेंद्र रायका, सामाजिक कार्यकर्ते रवी काटगी, प्रकाश देशपांडे, विश्वास किरमटे, पंकज कुट्रे, सदानंद मासेकर, ईस्कॉन संस्थेचे राजू कलाम, शिवा मयेकर, संजय मयेकर, ज्योतीबा देवलकर, सनी मयेकर, रवी पाटील, विनायक चव्हाण, दिलीप सोनटक्के, जीन्नाप्पा हट्टीहोळी, प्रशांत काजुनेकर, रोहित पोळ, रजत सडेकर तसेच वेगवेगळ्या संस्थेचे हिंदुत्ववादी कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta