Sunday , July 26 2026
Breaking News

बंगळुर सीसीबीकडून आंतरराज्यीय सायबर टोळीचा पर्दाफाश; डिजिटल अरेस्टच्या नावाखाली कोट्यवधींची लूट

Spread the love

 

बंगळूर : देशभरात “डिजिटल अरेस्ट”च्या नावाखाली ज्येष्ठ नागरिक, निवृत्त वरिष्ठ अधिकारी आणि श्रीमंत व्यक्तींना लक्ष्य करून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांच्या मोठ्या जाळ्याचा बंगळुर सीसीबी सायबर कमांड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शिवाजीनगर परिसरातील एका वृद्ध महिलेला डिजिटल जाळ्यात अडकवून तब्बल २४ कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणात ओमप्रकाश, गौरव, शिवगणव, अक्कच मलिक, पालकभाई पटेल, अमित नरेंद्र पटेल, ओमप्रकाश राजपूत आणि गौरव कुमार अशी आरोपींची नावे समोर आली आहेत.

गुरुग्राममध्ये हायटेक कार्यालय

तपासात उघड झाल्यानुसार, आरोपींनी हरियाणातील गुरुग्राम येथे अत्याधुनिक कार्यालय उभारून देशभरातील सायबर फसवणुकीचे जाळे चालवले होते. हे आरोपी स्वतःला सीबीआय, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) किंवा मुंबई पोलिसांचे अधिकारी असल्याचे सांगून नागरिकांना व्हिडिओ कॉल करत होते.

“तुमच्या नावावर बेकायदा आर्थिक व्यवहार झाले आहेत” किंवा “ड्रग्सचे पार्सल तुमच्या नावाने आले आहे” असे सांगून नागरिकांना घाबरवले जात होते. त्यानंतर संबंधित व्यक्तींना अनेक दिवस व्हिडिओ कॉलवर ठेवून ‘डिजिटल अरेस्ट’ केल्याचा आभास निर्माण केला जात होता.

खात्यातील कोट्यवधी रुपये लंपास

कायद्याची पुरेशी माहिती नसलेल्या नागरिकांना गुन्ह्यातून सुटका करून देण्याचे आमिष दाखवून आरोपी त्यांच्या बँक खात्यातील रक्कम विविध खात्यांमध्ये वळवून घेत होते. विशेषतः मोठी बँक शिल्लक असलेले निवृत्त अधिकारी आणि एकटे राहणारे वृद्ध हे या टोळीचे प्रमुख लक्ष्य होते.

सामाजिक माध्यमांवरील खाती हॅक करून मोबाईल क्रमांक मिळवणे, विविध बँकांमधून बेकायदा माहिती गोळा करणे आणि आर्थिक स्थितीचा मागोवा घेणे, अशा पद्धतीने टोळी कार्यरत होती.

‘म्युल अकाउंट’द्वारे पैशांची विल्हेवाट

फसवणुकीतून मिळालेली रक्कम आरोपी काही मिनिटांतच विविध राज्यांतील २० हून अधिक ‘म्युल अकाउंट्स’मध्ये (भाड्याने घेतलेली बँक खाती) वर्ग करत होते. त्यामुळे पोलिसांना पैशांचा मागोवा घेणे अवघड जात होते.

कर्नाटकमध्येही या टोळीने आपले जाळे विस्तारले होते. स्थानिक तरुणांना कमिशनचे आमिष दाखवून श्रीमंत व्यक्ती आणि त्यांच्या बँक खात्यांची माहिती गोळा करण्यात येत होती.

६० लाख रुपये गोठवले

देशातील विविध राज्यांतील अनेक डिजिटल अरेस्ट प्रकरणांमध्ये याच टोळीचा सहभाग असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. बंगळुर सीसीबी सायबर पोलिसांनी आरोपींच्या विविध बँक खात्यांतील सुमारे ६० लाख रुपये गोठवले आहेत.

या रॅकेटमागे आणखी मोठे मास्टरमाइंड असल्याचा संशय असून, उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी हरियाणा आणि दिल्ली परिसरात पोलिसांनी तपास तीव्र केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

महामार्गालगतच्या ढाबे, हॉटेल, विक्री केंद्रांवर ग्रामपंचायतींकडून शुल्क आकारणी

Spread the love  बंगळूर : ग्रामपंचायत हद्दीतील राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत कार्यरत असलेल्या तात्पुरत्या ग्रॅनाइट-मार्बल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *