Sunday , September 20 2026
Breaking News

सुपीक जमिनींसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र; रेल्वे प्रकल्पाविरोधात आक्षेप

Spread the love

 

बेळगाव : बेळगाव-धारवाड नवीन रेल्वे मार्गासाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहण प्रक्रियेला परिसरातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जोरदार विरोध दर्शविला आहे. गर्लगुंजी, नंदीहळ्ळी आणि केकेकोप्प गावांतील २०० हून अधिक शेतकऱ्यांनी केआयडीबी विशेष भूमी अधिग्रहण अधिकाऱ्यांच्या कार्यालयावर धडक देत प्रकल्पाविरोधात लेखी आक्षेप नोंदविले.

विशेष भूअधिग्रहण अधिकारी मंजुनाथ डोंबर यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारून सकारात्मक तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

प्रस्तावित रेल्वे मार्ग हा अत्यंत सुपीक शेतीमधून जात असल्याने गेल्या सात वर्षांपासून शेतकरी या प्रकल्पाला विरोध करत आहेत. “या जमिनीत वर्षातून तीन पिके घेतली जातात. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. परिसरात अल्प खोलीवर मुबलक पाण्याच्या बोअरवेल असल्याने ही जमीन आमच्या उपजीविकेचा प्रमुख आधार आहे,” अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

शेतकऱ्यांनी प्रशासनाला पर्यायी नापीक जमिनींचा पर्याय स्वीकारण्याची मागणी करत, “सुपीक जमीन कोणत्याही परिस्थितीत देणार नाही,” असा स्पष्ट इशारा दिला. रेल्वे मार्गामुळे वीजवाहिन्या, जनावरांची ये-जा, ट्रॅक्टर मार्ग तसेच पाइपलाइन व्यवस्थेवर परिणाम होणार असल्याची चिंताही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रसाद पाटील यांनी अधिकाऱ्यांना उद्देशून, “राजकीय दबावाखाली शेतकऱ्यांचे नुकसान करू नका. आमच्या शेतीवरच आमचे जीवन अवलंबून आहे,” असे सांगितले.

आंदोलनात प्रसाद पाटील, सुनील पाटील, संतोष पाटील, मारुती लोकूर, किरण लोंढे, राजेंद्र पाटील, पुंडलिक मेलगे, सुरेश जाधव, कृष्णा सिद्धानी, सुधाकर पाटील यांच्यासह गर्लगुंजी, नंदीहळ्ळी, केकेकोप्प, हलगीमर्डी आणि नागेनहट्टी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *