बेळगाव : रायबाग (जि. बेळगाव) : पत्नीने गावाकडे जाऊया, असे म्हटल्यावर एकाने रागाच्या भरात स्वतःच्या 4 महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर आपटले. त्यात त्या कोवळ्या जिवाचा मृत्यू झाला. हा प्रकार चिंचली (ता. रायबाग) येथे सोमवारी घडला. संचित बसप्पा बळनुकी (वय 4 महिने) असे बालकाचे नाव आहे. बसप्पा रंगप्पाबळनुकी असे त्याच्या वडिलांचे नाव आहे. बसप्पा केएसआयएसएफमध्ये पोलिस आहे.
याबाबत कुडची पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बसप्पा अथणी तालुक्यातील दुरडुंडी येथील रहिवासी आहे. त्याचा 19 महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. त्याच्या पत्नीचे माहेर चिंचली आहे. ती तेथे असल्याने बसप्पा पत्नीला आणण्यासाठी सासूरवाडीला सायंकाळी गेला होता. यावेळी पत्नीने आज सण आहे, उद्या जाऊया, असे म्हटल्यावर बसप्पाला राग अनावर झाला. त्याने पत्नीला आजच जायचे, असे बजावले. तरी पत्नीने न ऐकल्याने त्याने घरासमोर जाऊन आपल्या चार महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर जोराने आदळले. त्यात बाळाला जोराचा मार बसून ते जागीच ठार झाले. हा प्रकार पाहून परिसरातील लोक धावत आले. त्यांनी बाळाला तातडीने रुग्णालयात नेले; मात्र त्याचा मृत्यू झाला होता. बसप्पा (केएसआयएसएफ सांबरा) येथे राखीव पोलिस आहे. कुडची पोलिस ठाण्यात सोमवारी या प्रकाराची नोंद झाली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत बळनुकी याला मंगळवारी अटक केली. त्याची गोकाक उपकारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta