Wednesday , April 17 2024
Breaking News

विधान परिषदेसाठी बेळगावात 99.97 टक्के मतदान

Spread the love

बेळगाव : विधान परिषदेच्या बेळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील दोन जागांसाठी एकूण 8,849 मतदारांपैकी 8,846 जणांनी मतदानाचा हक्क बजावलामुळे जिल्ह्यात एकूण 99.97 टक्के मतदान झाले आहे. बेळगाव व खानापूर या मराठीबहुल भागांपैकी खानापूर तालुक्यात 100 टक्के मतदान झाले असले तरी बेळगाव तालुक्यात एकाने मतदानाचा हक्क न बजावल्यामुळे 99.97 टक्के इतके कमी मतदान झाले. संबंधित राहून गेलेले एक मत कोणाचे आहे? याचा खुलासा तूर्तास झाला झालेला नाही.
विधान परिषदेच्या बेळगाव मतदारसंघातील दोन जागांसाठी आज मतदान प्रक्रिया उत्स्फूर्त प्रतिसाद शांततेने पार पडली. बेळगाव व खानापूर या मराठीबहुल भागांतील जवळपास सर्वच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बेळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत सदस्यांसह महापालिकेतील नगरसेवक आणि आमदारांना मतदानाचा अधिकार होता.
बेळगाव जिल्हा पंचायत आणि तालुका पंचायत सभागृह अस्तित्वात नसल्यामुळे ता. पं. आणि जि. पं. सदस्यांना मात्र आजच्या मतदानापासून वंचित रहावे लागले. तथापि मतदानाची टक्केवारी 99 टक्क्याहून अधिक होती. बेळगाव तालुक्यातील 570 पुरुष आणि 526 महिला अशा एकूण 1096 मतदारांपैकी आज 1095 जणांनी मतदान केले. या ठिकाणी एका मतदाराने आपला मतदानाचा अधिकार न वापरल्यामुळे एक मत कमी पडून मतदानाची टक्केवारी 99.91 टक्के इतकी झाली. संबंधित एक मत कोणाचे राहून गेले याचा खुलासा तूर्तास झालेला नाही. या एका मतामुळे निवडणूक निकालाचे चित्र पालटण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे आज बोलले जात होते.
खानापूर तालुक्यात विधानपरिषद निवडणुकीसाठी 100 टक्के मतदान झाले. या ठिकाणच्या 296 पुरुष आणि 347 महिला अशा एकूण सर्व 642 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बेळगाव तालुक्याव्यतिरिक्त अथणी आणि रामदुर्ग तालुक्यामध्ये देखील प्रत्येकी एका मतदाराने आज आपला मतदानाचा हक्क बजावला नाही. विधान परिषदेच्या दोन जागांसाठी जिल्ह्यातील विविध तालुक्यात आज झालेले मतदान (अनुक्रमे तालुका, एकुण मतदार आणि झालेले मतदान यानुसार) खालीलप्रमाणे आहे.
निपाणी : 534 पैकी 534 (100 टक्के), चिक्कोडी -सदलगा : 718 पैकी 718 (100 टक्के), अथणी : 797 पैकी 796 (99.89 टक्के), कागवाड : 202 पैकी 202 (100 टक्के), रायबाग : 731 पैकी 731 (100 टक्के), हुक्केरी : 931 पैकी 931 (100 टक्के), मुडलगी : 368 पैकी 368 (100 टक्के), गोकाक : 684 पैकी 684 (100 टक्के), बेळगाव : 1096 पैकी 1095 (99.91टक्के), खानापूर : 642 पैकी 642 (100 टक्के), कित्तूर : 233 पैकी 233 (100 टक्के), बैलहोंगल : 571 पैकी 571 (100 टक्के), सौंदत्ती : 353 पैकी 353 (100 टक्के), राम्दुर्ग 589 पैकी 588 (99.83 टक्के). या पद्धतीने जिल्ह्यात एकूण 511 मतदान केंद्रांवर 4,201 पुरुष आणि 4,638 महिला अशा एकूण 8,849 मतदारांपैकी पैकी 8,846 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
काँग्रेसचा पराभव करणे हे आमचे ध्येय : रमेश जारकीहोळी
बेळगाव : मी भाजपचा आमदार आहे. निवडणुकीत भाजपला विजय मिळवून देणे हे माझे पहिले ध्येय नसून काँग्रेसचा पराभव करणे हे माझे ध्येय आहे, असे आज आमदार रमेश जारकीहोळी म्हणाले आहेत.
बेळगाव येथे विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधला. मी भाजपचा आमदार असून भाजपला जिंकवणे हे माझे ध्येय नाही, काँग्रेसचा पराभव करणे हे ध्येय आहे. निकाल कळला की सगळं लक्षात येईलच, अशी गुगली त्यांनी टाकली.
निवडणुकीत जास्त पैसे वाटप होत असल्याबाबत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, निवडणुकीत पैसा हा एकमेव महत्त्वाचा मुद्दा नाही. लोकही चांगले वागताना दिसताहेत.
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही त्यासाठी तयार आहोत. आधीच ते गुहेत बसले आहेत. काही कायदेशीर कृती असल्यास, त्यांना ते करू द्या.
आमदार सतीश जारकीहोळी यांच्या प्रतिक्रियेबाबत बोलताना ते म्हणाले, सतीश हतबल झाले आहेत. काँग्रेसची एक चतुर्थांश मतांवर घसरण होत आहे. मुख्यमंत्र्यांमुळे राज्यात चांगलेच वातावरण आहे. 2023 मध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल याबद्दल सतीश निराश झाले आहेत, असेही ते म्हणाले.
कवटगीमठ आणि लखनपैकी एकटाच जिंकणार : सतीश जारकीहोळी
बेळगाव : विधान परिषद निवडणुकीत भाजप आणि अपक्ष उमेदवाराहून अधिक मते घेऊन काँग्रेस उमेदवार विजयी होईल असा विश्वास केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केला.
विधान परिषद निवडणुकीत शुक्रवारी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर पत्रकारांशी बोलताना जारकीहोळी म्हणाले, मी आणि आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी काँग्रेस नगरसेवकांसह मतदान केले आहे. काँग्रेस उमेदवाराचा विजय निश्चित आहे हे आम्ही वरचेवर सांगत आहोत. या निवडणुकीत काँग्रेस, भाजप आणि अपक्ष अशी त्रिकोणी लढत होत आहे. भाजप आणि अपक्ष उमेदवाराहून अधिक पहिल्या पसंतीची मते घेऊन काँग्रेस उमेदवार चन्नराज हट्टीहोळी विजयी होईल हे नक्की आहे.
लखन जारकीहोळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत का या प्रश्नावर, कदाचित असतीलही, परंतु ती 6 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. ते आता कसे शक्य आहे? रमेश जारकीहोळी त्यांच्याबाजूने प्रचार करतात.
भाजपचे आमदार त्यांच्याबाजूने प्रचार करतात. लखनचा आमचा काहीही संबंध नाही हे आम्ही आधीच स्पष्ट केले आहे. अजून कवटगीमठ आणि लखन या दोघांपैकी एकजण जरूर निवडून येईल. कारण आमची स्पर्धा थेट आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच जिंकून येऊ असे सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
एकंदर विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरु असतानाही राजकीय पक्ष आपापल्या विजयाचे दावे करत आहेत. यात कोण खर्‍या अर्थाने जिंकणार आणि कोण हरणार हे 14 डिसेंबरलाच कळणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

अम्युजमेंट रोबोटिक बटरफ्लाय व एनिमल्स प्रदर्शनाचे उद्घाटन

Spread the love  बेळगाव : “कर्नाटकाच्या विविध भागात अशा प्रकारची प्रदर्शने आयोजित करून बेळगावात आलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *