Saturday , July 27 2024
Breaking News

सीमाभागात आज पहिले मराठी ऑनलाईन साहित्य संमेलन

Spread the love

बेळगाव : सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृतीला संजीवनी मिळावी व नवोदित कवी, लेखकांना व्यासपीठ मिळावे, यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद पुणे अंतर्गत बेळगाव शाखा आयोजित सीमाभागातील पहिले अखिल भारतीय ऑनलाईन साहित्य संमेलन रविवार दि.२५ रोजी दोन सत्रात होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक श्रीराम पचिंद्रे संमेलनाध्यक्ष असून उदघाटक म्हणून दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना नेते, खासदार संजय राऊत असणार आहेत.
सकाळी ११ वाजता संमेलनाला प्रारंभ होईल. संमेलनाचे फेसबुक, युट्यूब, टेलिग्राफवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुपारी एक वाजता होणाऱ्या कवी कट्टा या दुसऱ्या सत्रात संमेलनाध्यक्ष म्हणून आनंद शेंडे उपस्थित राहणार आहेत. या कविसंमेलनात सीमाभागासह महाराष्ट्रातील 66 कवींचा सहभाग आहे. स्वागताध्यक्ष अभामसाप राष्ट्रीय अध्यक्ष व साहित्यिक शरद गोरे असून या संमेलनाला दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार कवी डॉ.अमोल बागुल व शिवसंत संजय मोरे विशेष अतिथी म्हणून तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय उपाध्यक्षा शुभांगीताई काळभोर व सुप्रसिद्ध साहित्यिक ज्ञानेश्वर पतंगे उपस्थित राहणार आहेत. यावेळी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष रवींद्र पाटील, संयोजक जिल्हाध्यक्ष अँड.सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष डी.बी.पाटील, निवेदक रणजित चौगुले, अरूणा गोजे-पाटील आदी मान्यवर सहभागी होणार आहेत.
संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक श्रीराम पचिंद्रे यांची फुलोरा, पत्रे सुरेश भटांची, भ्रष्टासुराच्या कथा, सूर्यपंख, मुलाखत आणि शब्दांकन, लक्ष्यवेध, रंग मैफलीचा आदी पंधरा पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी २५ हून अधिक दिवाळी अंकांचे संपादन केले असून पाचशे वृत्तपत्रीय लेख प्रसिद्ध आहेत. बालभारती मराठी पाचवीच्या पुस्तकात ‘शाहू’ कादंबरीतील पाठ समाविष्ट आहे.
दहा राष्ट्रीय परिषदांत सहभाग घेतला असून त्यांना तीस पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना राज्य पातळीवरील वीस कविसंमेलनांचे अध्यक्षपद मिळाले आहे. संमेलनाचे उदघाटक संजय राऊत हे जेष्ठ पत्रकार, दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक, शिवसेना गटनेते, शिवसेना नेते व खासदार असून ते प्रभावी वक्तृत्वा साठी प्रसिद्ध आहेत.
स्वागताध्यक्ष अभामसाप राष्ट्रीय अध्यक्ष व साहित्यिक शरद गोरे यांनी आपल्या नेत्तृवात देशभर एकूण १०४ साहित्य संमेलन यशस्वीरित्या आयोजित केली आहेत. त्यांची दहा पुस्तके प्रकाशित असून छञपती संभाजी महाराज यांनी संस्कृत भाषेत लिहिलेला बुधभूषण हा अत्यंत दुर्मिळ व महत्त्वपूर्ण ग्रंथ मराठीत काव्य भाषांतरित केला आहे. त्यांची विविध विषयांवर एक हजारहून अधिक व्याख्याने झाली असून सहा चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शक आणि संगीत दिले आहे. कवी संमेलनाध्यक्ष आनंद शिंदे हे वणी, यवतमाळ येथील असून कविता व चारोळी लेखनासाठी ते प्रसिद्ध आहेत. भा मराठी साहित्य परिषदेच्या यवतमाळ जिल्हा अध्यक्षपदी त्यांची निवड झाली आहे. अमरावती येथील फुले-शाहू-आंबेडकर प्रतिष्ठान तर्फे त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. आकाशवाणी व महाराष्ट्रातील विविध ठिकाणी त्यांच्या कवितांना रसिकांनी दाद दिली आहे.
संमेलनाचे निमंत्रक असलेले रवींद्र पाटील अ.भा.मराठी साहित्य परिषदचे कर्नाटक प्रदेशाध्यक्ष असून पत्रकार, तंत्रस्नेही शिक्षक , समालोचक,निवेदक तसेच सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात अग्रेसर राहणारे व्यक्तिमत्त्व आहे. मराठी विषयाचे सहाय्यक शिक्षक म्हणून ते शिनोळी बुद्रुक येथील राजश्री शाहू माध्यमिक विद्यालयात सेवेत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या काव्य मैफलीत त्यांनी लढा कविता सादर केल्यानंतर त्यांना सीमा कवी म्हणून जाहीर करण्यात आले. आविष्कार फाउंडेशनचे ते बेळगाव जिल्हाध्यक्ष असून चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे तालुका समन्वयक आहेत. विविध पुरस्कारांनी ते सन्मानित झाले आहेत. संमेलनाचे संयोजक अँड. सुधीर चव्हाण वकिली पेशा सांभाळत मराठी भाषा व संस्कृतीच्या संवर्धनासाठी कार्यरत असतात. अ. भा. मराठी साहित्य परिषदेच्या बेळगाव जिल्हा अध्यक्षपदी ते कार्यरत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

मुसळधार पावसामुळे कडोली येथे घर कोसळले!

Spread the love  कडोली : बेळगाव तालुक्यातील कडोली गावात बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे जुने घर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *