बेळगाव : गुरुवारी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. मिरवणूक बंदोबस्तासाठी 2000 हून अधिक पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. यासाठी जलद कृती दलाची एक तुकडी देखील बेळगाव शहरात दाखल झाली असून सोमवारी सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरून पथसंचलन करण्यात आले. सिद्धरामप्पा यांच्या नेतृत्वाखाली श्री विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची तयारी करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा आदींसह शहरातील बहुतेक अधिकाऱ्यांनी रोज रात्री शहराचा फेरफटका मारण्यास सुरुवात केली आहे. घरातील संवेदनशील भागात प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी होते त्यामुळे गणेश भक्तांची गैरसोय होऊ नये मिरवणूक शांततेत उत्साहात पार पडावी यासाठी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे. पोलिस आयुक्तांसह पोलीस प्रमुख दर्जाचे सात अधिकारी, २५ एसीपी आणि डीएसपी ७० पोलीस निरीक्षक, ९० पोलीस उपनिरीक्षक, १८० सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बंदोबस्तासाठी असणार आहेत. राज्य राखीव दलाच्या १० जिल्हा सशस्त्र दलाच्या सहा तुकड्यांचे बंदोबस्तांसाठी नियोजन करण्यात आले असून राज्यातील विविध जिल्ह्यातून पोलीस दल मागवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली.
कोणत्याही परिस्थितीत मिरवणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस दलाने सर्वतोपरी तयारी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील संवेदनशील व अतिसंवेदनशील भागातील हालचालींवर पोलीस प्रशासनाचे लक्ष असणार आहे. विसर्जन मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आठ ड्रोनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण मिरवणूक मार्गात सुमारे ३५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ड्रोन आणि कॅमेरा यांच्या माध्यमातून प्रशासनाची नजर विसर्जन मिरवणुकीवर असणार आहे. विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने कंबर कसली आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या पथसंंचलनात पोलीस उपायुक्त व शहरातील एसपी पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांनी भाग घेतला होता. राणी चन्नम्मा सर्कल पासून पथसंचलनाला सुरुवात करण्यात आली होती.