बेळगाव : परदेशात नवीन ओमिक्रोन व्हायरसचा शोध लागल्यानंतर कर्नाटक सरकार सतर्क झाले आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्ममई यांनी आंतरराष्ट्रीय प्रवाश्यांप्रमाणेच महाराष्ट्र आणि केरळमधून येणार्या प्रवाशांना आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल अनिवार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान कर्नाटक सरकारच्या नव्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे, 19 डिसेंबरला होणार्या सौंदत्ती येथील पोर्णिमेला कोरोना नियमांचे काटेकोर पालन करूनच भाविकांना श्री रेणुका देवीचे दर्शन दिले जाणार आहे.
डिसेंबर महिन्यातील पोर्णिमेला होणार्या सौंदती येथील श्री रेणुका देवीच्या यात्रेला महाराष्ट्रातील रेणुका भक्तांची सर्वाधिक उपस्थिती असते. डिसेंबर महिन्यातील पूर्णीमा यात्रेला प्रत्येक वर्षी महाराष्ट्रातील किमान तीन लाख रेणुका भक्त सौंदतीला दाखल होत असतात. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा परिसरातील रेणुका भक्तांची संख्या मोठी असते. कर्नाटक शासनाने ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत.
डिसेंबर महिन्यातील 19 तारखेला पौर्णिमा आहे. या दिवशी सायंकाळी पावणे चार वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत मंगळसूत्र आणि कंकण विसर्जन विधीसाठी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर पूर्णिमेला श्री रेणुका देवीच्या दर्शनासाठी येणार्या भाविकांना पोलीस नाक्यांवर पोलिसांना लसीकरणाचे दोन्ही डोस पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र आरटीपीसीआर नकारात्मक अहवाल आदि दाखविणे अनिवार्य ठरणार आहे. त्याचबरोबर संपूर्ण रांगेत सुरक्षित अंतर ठेवून देवी दर्शन घ्यावे लागणार आहे. डोंगरावर येणार्या भाविकांना दर्शना व्यतिरिक्त अन्य कोणत्याही धार्मिक विधीची परवानगी देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाणार आहे.
पौर्णिमेला देवी दर्शनासाठी होणारी भाविकांची गर्दी पाहता, जिल्हा प्रशासनाने विशेष आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार कोरोना नियमांचे काटेकोर पालन करूनच भाविकांना देवी दर्शन दिले जाणार आहे. भाविकांनीही कोरोनाची आणि स्वत:च्या तसेच इतरांच्या आरोग्याची खबरदारी घेत, देवी दर्शनासाठी येत असताना आवश्यक त्या प्रमाणपत्र आणि नियमांचे पालन करावे. जिल्हा प्रशासनाने बजावलेल्या आदेशानुसारच देवी दर्शन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन सौंदती श्री रेणुकादेवी मंदिराचे विशेष कार्यकारी अधिकारी रवी कोटारगस्ती यांनी केले आहे.
