
कारखाने बंद पाडण्याचा राजू शेट्टींचा इशारा
बेळगाव (वार्ता) : साखरेचे दर वाढल्याने गतवर्षीच्या ऊसाला दुसरा हप्ता म्हणून प्रतिटन चारशे रुपये, यंदाच्या हंगामातील ऊसाला प्रतिटन ३८०० रुपये दर देण्यासह इतर मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून निदर्शने केली. संघटनेच्या मागण्या मान्य न केल्यास साखर कारखाने सुरु करू देणार नसल्याचा असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, कर्नाटक राज्य रयत संघ आणि हसीरू सेनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली बेळगावात शेतकऱ्यांनी चाबूक मोर्चा काढून चन्नम्मा चौकात ठिय्या आंदोलन केले. यावेळी बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरीही उपस्थित होते.
किल्ला तलावाजवळील अशोक सर्कलमधून चाबूक मोर्चाला प्रारंभ झाला. हिरव्या टोप्या, शाली घालून, हातात चाबूक आणि ऊस घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने या मोर्चा सहभागी झाले होते. हातातील चाबकाने रस्त्यावर फटकारे मारत, मागण्यांच्या पूर्ततेसाठी घोषणाबाजी करत चन्नम्मा चौकापर्यंत मोर्चा काढून चौकात रस्त्यावरच ठिय्या मांडून निदर्शने करण्यात आली. यावेळी काही काळ रस्ता रोखून धरल्याने चौकात वाहनांची कोंडी झाली.

यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रमुख माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, गेल्या गळीत हंगामाची ऊस बिले बहुतेक साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे दिली आहेत. पण कारखान्यांनी चढ्या भावाने साखरविक्री करून आणि डिस्टिलरी असलेल्या कारखान्यांनी उपपदार्थांच्या विक्रीतून मोठा नफा कमवला आहे. त्यामुळे रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार एफआरपी दिला तरी अतिरिक्त पैसे कारखान्यांनी शेतकऱ्यांना देणे लागतात. त्याशिवाय गेल्यावर्षीचा 400 रुपयाचा दुसरा हप्ता दसऱ्यापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना द्यावा अन्यथा आम्ही कारखाने सुरु करू देणार नाही. सरकारनेसुद्धा कारखान्यांना याबाबत सूचना द्यावी अन्यथा सरकारलाही याची किंमत मोजावी लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
आणखी एका शेतकरी नेत्याने सांगितले की, ऊस उत्पादकांच्या जीवावर चालणारे साखर कारखाने नफ्यात असूनही कारखानदार शेतकऱ्यांना योग्य भाव देत नाहीत, थकीत हप्ते देण्यास विलंबाचे धोरण राबवितात. त्यामुळे ऊस उत्पादक अडचणीत आहेत. कारखान्यांनी गेल्यावर्षीचा दुसरा हप्ता दसर्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा अन्यथा राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राप्रमाणेच कर्नाटकातही उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला.
गणेश नामक शेतकरी नेत्याने सांगितले की, बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला सकाळी 11 वाजता बैठकीला बोलावले, मात्र कारखानदारांना दुपारी ४ वाजता बोलावले. समोरासमोर बसून चर्चा करायची असताना दोघांना वेगवेगळ्या वेळा देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. ऊस उत्पादकांना लावणी, तोड, वाहतूक आदी बाबींवर प्रतिटन येणार खर्च वाढला असूनही कमी एफआरपी दिला जातोय. त्यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यांच्या समस्या सरकारने न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला.
दरम्यान, चन्नम्मा चौकात निदर्शक शेतकऱ्यांनी भर रस्त्यात ठाण मांडल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. निदर्शनानंतर बेळगाव जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या आंदोलनात बेळगावसह विविध ठिकाणच्या ऊसउत्पादक, शेतकरी, ऊस वाहतूकदार आदींनी भाग घेतला.
Belgaum Varta Belgaum Varta