
११ जिल्ह्यातील आणखी २१ तालुक्यांचा समावेश
बंगळूर : पहिल्या यादीत वगळण्यात आलेल्या बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव व खानापूर तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या आधी राज्यातील १९५ तालुके दुष्ळग्रस्त म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले होते. त्यात आता ११ जिल्ह्यातील आणखी २१ तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता राज्यातील २३७ पैकी २१६ तालुके दुष्काळग्रस्त ठरले आहेत.
राज्य सरकारने तीन आठवड्यापूर्वीच १९५ तालुके अधिकृतपणे दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले होते. त्यामुळे वगळण्यात आलेल्या कांही दुष्काळग्रस्त तालुक्यातून नाराजी पसरली होती. राज्य रयत संघटनेसह विविध शेतकरी संघटनानी मोर्चे काढून व निवेदने देऊन परिस्थितीचे पुन्हा अवलोकन करण्याची व आपल्या तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समावेश करण्याची जोरदार मागणी केली होती. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा अहवाल घेऊन दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.
या यादीनुसार आता बेळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक १५ तालुके दुष्काळग्रस्त ठरले आहेत. जिल्ह्यातील १३ तालुक्यांचा पहिल्या यादीत तसेच बेळगाव व खानापूर या दोन तालुक्यांचा दुसऱ्या यादीत समावेश करण्यात आला आहे.
दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आलेले दुसऱ्या यादीतील तालुके असे –
१ बेळगाव – बेळगाव, खानापूर
२ चामराजनगर- चामराजनगर, यळंदूर
३ म्हैसूर-कृष्णराजसागर
४ गदग- मुंडरगी
५ हावेरी- बॅडगी, हानगल, शिग्गाव
६ धारवाड- कलघटगी, अळणावर, अण्णीगेरी
७ हासन-आलूरू, आरसीकेरे, हासन
८ चिक्कमंगळूर- मूडिगेरे, तरीकेरे
९ कोडगू- पून्नंपेठ
१० उडपी- हेब्री
११ उत्तर कन्नड (कारवार)- सिद्दापूर, दांडेली
राज्य सरकारने पहिली यादी केंद्राला पाठवून दुष्काळ निवारणासाठी निधीची मागणी करणारे निवेदन केंद्राला सादर केले होते. त्यानुसार केंद्र सरकारची तीन पथके राज्याच्या निरिक्षण दौऱ्यावर आले होते. गेले तीन दिवस त्यांनी विविध ठिकाणी भेट देऊन पहाणी केली. त्यांनी सरकारला आपला अहवाल सादर केल्यानंतर केंद्राकडून राज्याला दुष्काळ निवारण निधीची अपेक्षा आहे.
नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फंड (एनडीआरएफ) आणि स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फंड (एसडीआरएफ) निकषांनुसार दुष्काळ निवारणाची कामे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील.
दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केलेल्या तालुक्यांपैकी बहुसंख्य तालुके उत्तर कर्नाटकात आहेत, ज्यात नवीन यादीसह सर्वाधिक १५ बेळगाव, त्यानंतर विजयपुर (१२) आणि गुलबर्गा (११) आहेत. तसेच, जुने म्हैसूर प्रदेश आणि मध्य कर्नाटकातील तालुक्यांची संख्या अधिक आहे. सर्वात कमी असलेल्यांमध्ये उडुपी तीन आणि दक्षिण कन्नड दोन आणि बिदर तीन तालुके दुष्काळग्रस्त आहेत.
दक्षिण पश्चिम मान्सून ८ जून रोजी कर्नाटकात दाखल झाला आणि १४ दिवसांनंतर तो राज्यभर पसरला. जूनमध्ये राज्यात सरासरीपेक्षा ५६ टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे. राज्यात जुलैमध्ये जास्त पाऊस झाला असला तरी ऑगस्टमध्ये ७३ टक्के पाऊस पडला. पावसाची ही नोंद गेल्या १२५ वर्षांतील सर्वात कमी आहे.
Belgaum Varta Belgaum Varta