बेळगाव : बेळगावमध्ये होणार्या कर्नाटकी विधानसभेच्या अधिवेशनाचा निषेध म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने भरविण्यात येणार्या मराठी भाषिक महामेळाव्याला बेळगाव जिल्हा शिवसेनेने जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे. व्हॅक्सिन डेपो मैदानावर 13 डिसेंबर रोजी होणार्या महामेळाव्याला बेळगाव जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी केले आहे.
जिल्हा शिवसेना विभागीय कार्यालयात बोलावण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
कर्नाटक सरकारच्या विधानसभा अधिवेशनाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समिती आयोजित महामेळाव्याला मराठी भाषिकांचा जनसागर लोटला पाहिजे. त्या अनुषंगाने शिवसैनिकांनी आपापल्या भागात जनजागृती करावी आणि महामेळाव्याच्या धर्तीवर कर्नाटकी अधिवेशनाला चोख प्रत्युत्तर द्यावे, असेही प्रकाश शिरोळकर यावेळी बोलताना म्हणाले. याप्रसंगी जिल्हा संघटक रवींद्र जाधव, ज्येष्ठ शिवसैनिक महेश टंकसाळी, तालुका प्रमुख सचिन गोरले, मजगाव विभाग प्रमुख प्रसाद काकतकर, शहापूर विभाग प्रमुख राजू कणेरी, विजय सावंत, रमेश माळवी, बाळासाहेब डंगरले, विनय कोवाडकर, वैजनाथ भोगण, राजेश कदम, रवी धनुचे, राहुल कुडे यासह बेळगाव शिवसेनेचे अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.