जांबोटी : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 13 नोव्हेंबर रोजी बेळगाव येथे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे याबद्दल खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती तसेच युवा म. ए. समितीच्यावतीने शनिवारी जांबोटी येथे समिती कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेऊन जनजागृती करण्यात आली.
कर्नाटक सरकारने बेळगाव वर आपला हक्क सांगण्यासाठी मराठी भाषिकांचा विरोध डावलून सोमवार दि. 13 नोव्हेंबरपासून बेळगाव येथील विधानसौधमध्ये विधी मंडळाचे हिवाळी अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
बेळगाव येथे हे अधिवेशन भरवून कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला आहे. बेळगाव हे कर्नाटकाचे आहे असे भासविण्यासाठी कर्नाटक सरकारने बेळगावमध्ये विधानसभेचे अधिवेशन भरविण्याचा आटापिटा चालविला आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने सोमवार दि. 13 नोव्हेंबर रोजी व्हॅक्सिनडेपो येथे महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला हजारोंच्या संख्येने मराठी भाषिकांनी उपस्थित रहावे यासाठी सीमाभागामध्ये विविध संघटनांच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे.
शनिवारी जांबोटी येथे खानापूर तालुका युवा म. ए. समितीच्यावतीने जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना खानापूर तालुका युवा म. ए. समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील म्हणाले, सीमाप्रश्न न्याय प्रविष्ट असताना कर्नाटक सरकारने बेळगाव वर आपला हक्क गाजविण्याचा आटापिटा चालविला आहे, मराठी भाषिकांची दडपशाही होत आहे. यासाठी मराठी भाषिकांनी हजारोंच्या संख्येने म्हामेळाव्याला उपस्थित राहून आपल्यावर होणार्या अन्यायाला वाचा फोडावी असे आव्हान केले.
यावेळी जांबोटी बस स्थानकावर फिरून जांबोटी भागातील नागरिक तसेच व्यापारी वर्ग, शालेय विद्यार्थी वर्गामध्ये मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहावे या संदर्भात जनजागृती करण्यात आली.
यावेळी खानापूर तालुका म. ए. समितीचे चिटणीस गोपाळराव देसाई, मध्यवर्ती म. ए. समितीचे सदस्य सूर्याजी पाटील, युवा समितीचे कार्यकर्ते राजू पाटील, राहुल पाटील, हनुमंतराव साबळे, युवा समितीचे उपाध्यक्ष पिंटू नावलकर, हणमंत जगताप, म. ए. समितीचे उपाध्यक्ष वासुदेव पाटील, वसंत नावलकर, श्रीपाद भरणकर, शिवाजी गावकर तसेच बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
