बेळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी ‘भव्य काशी-दिव्य काशी‘ काशी विश्वनाथ धाम प्रकल्प देशाला लोकार्पण करणार आहेत. तो कार्यक्रम एलईडी स्क्रीनवर पाहण्याची व्यवस्था भाजपतर्फे करण्यात आली आहे असे राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली यांनी सांगितले.
शनिवारी बेळगावात पत्रकार परिषदेत बोलताना भाजप राज्य प्रवक्ता एम. बी. जिरली म्हणाले, मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय विकासासह प्राचीन अध्यात्मिक केंद्रांच्या जीर्णोद्धाराची मोहीम हाती घेतली आहे. वाराणसीचे खासदार या नात्याने गेल्या 3-4 वर्षांत काशी विश्वनाथ धामचा विकास करून उद्या त्याचे लोकार्पण मोदींच्याहस्ते होणार आहे. या निमित्त 13 व 14 डिसेंबरला देशातील महापौरांची परिषद, भव्य कृषी मेळावा आदी कार्यक्रम होणार आहेत. सेंद्रिय शेती करणार्या शेतकर्यांना खास यासाठी निमंत्रित केले आहे. त्याचप्रमाणे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 11 जानेवारीला युवकांचा भव्य मेळावा घेण्यात येणार आहे.
यावेळी भाजप महानगर जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील म्हणाले, ‘भव्य काशी-दिव्य काशी’निमित्त महाशक्ती केंद्रातही कार्यक्रम होणार आहेत. खासकरून कपिलेश्वर मंदिर, कणबर्गी, येळ्ळूर, धामणे आदी 25 ठिकाणी स्वच्छता कार्यक्रम होणार आहेत. त्यानंतर पूजा कार्यक्रम होतील.
भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले, जिल्हा पंचायतीच्या धर्तीवर बेळगाव ग्रामांतरमधील 8 मंडळात महाशक्ती केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मंदिरांसह 40 ते 50 ठिकाणी हे स्वच्छता कार्यक्रम होणार आहेत. पत्रकार परिषदेला उज्वला बडवाण्णाचे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
