
बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्राच्या अहमदनगर शहरातील शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, लेखक व पत्रकार हेरंब कुलकर्णी यांच्यावर नुकताच जीवघेणा हल्ला करण्यात आला. याच्या निषेधार्थ अंथश्रद्धा निर्मूलन समिती व प्रगतिशील लेखक संघ यांच्यावतीने शुक्रवारी हुतात्मा चौकात धरणे आंदोलन छेडले होते.
यावेळी बोलताना ज्येष्ठ विचारवंत प्रा. आनंद मेणसे म्हणाले की, प्राध्यापक, पत्रकार आणि साहित्यिक हेरंब कुलकर्णी यांनी शाळा परिसरातील गुटखा विक्रीची दुकाने बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाने त्यांची दखल घेऊन शाळा परिसरातील दुकाने पाडवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे सुपारी देऊन त्यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यातील आरोपी सापडले असले तरी त्यामागील सूत्रधार कोण त्याचा शोध घेऊन त्याला तात्काळ अटक करावी.
प्रा. मेणसे म्हणाले, अलीकडच्या काळात समाजात जनजागृती करणाऱ्या नागरिकांवर हल्ले वाढत आहेत. ही चिंतनीय बाब आहे. प्रा. कुलकर्णी यांनी प्रबोधन करण्यासह व्याख्यानातून विविध विषयावर जनजागृती केली आहे. त्यामुळे समाजात अनेक ठिकाणी बदल होत आहेत. त्यांच्या मारेकऱ्यांना अटक केली असली तरी शासनाने बोटचेपी धोरण स्वीकारले आहे. यापूर्वी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोळकर, कलबुर्गी, गोविंद पानसरे, गौरी लंकेश यांच्यावरही प्राणघातक हल्ला झाला आहे. त्यांचेही मारेकरी सापडले असले तरी खरे सूत्रधार अद्याप उजेडात आलेली नाही. त्यामुळे शासनाने कुलकर्णी यांच्या हल्ल्यामधील सूत्रधाराला तात्काळ अटक करावी. त्यासाठी बेळगाव शहरातील नागरिक रस्त्यावर उतरण्यास तयार असल्याचे मेणसे यांनी सांगितले.
यावेळी ऍड. नागेश सातेरी, कृष्णा शहापूरकर, सुभाष ओऊळकर, शंकर चौगुले, शेखर पाटील, अनिल अजगावकर, शिवलीला मिसाळे, नारायण उडकेकर, मधु पाटील, ऍड. अजय सातेरी, संदीप मुतगेकर, नीलिमा आपटे, प्रभावती शहापूरकर, शितल बडमंजी, अरविंद कालिंदे, नीला आपटे, गौरी ओऊळकर आदी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta