बेळगाव : देव, देश आणि धर्मासाठी प्रेरणा जागृत करणारी दुर्गामाता दौड आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाली. पहिल्याच दिवशी सळसळत्या उत्साहासह हजारो धारकरी, महिला आणि बालगोपाळ अगदी पहाटेच या दौडीत सहभागी झाले.जय शिवाजी, जय भवानी, हरहर महादेवच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता.
बेळगावात आजपासून रौप्यमहोत्सवी दुर्गामाता दौडीला अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला. बेळगावमधील छत्रे वाड्यातील, छत्रे गुरुजींच्या हस्ते या दौडीचे पूजन करून आणि ध्वज चढवून दौडीचा शुभारंभ करण्यात आला.
या दौडीच्या मार्गावर, फुलांच्या आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. लहान मुले बालशिवाजी, जिजाऊच्या वेशात अगदी दिमाखात उभी होती. जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ, अश्वारूढ मुर्त्यांचे पूजन करण्यात आले होते. महिलांनीदेखील अतिशय मेहनत घेऊन, दौडीचा मार्ग रांगोळ्यांनी सजवला होता आणि त्या दौडीचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत्या.
दौडीचे स्वागत करणाऱ्या शास्त्रीनगर येथील एका भगिनीने सांगितले की, दरवर्षीप्रमाणे आमच्या भागातील बंधुभगिनी तसेच बाळगोपाळांने दौडीच्या स्वागतासाठी सहकार्य केले आहे. या दौडीमुळे अभिमान आणि उत्साह वाढत आहे. हिंदू धर्मात जन्माला आल्याचा अभिमान वाटतो. आम्ही आमची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करीत आहोत असे सांगितले.
बेळगावचा छत्रे गुरुजींनी दौडीचा शुभारंभ करून ध्वज चढवला. या दौडीत भाग घेणाऱ्यांमध्ये राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करण्यात येत आहे. राष्ट्रपती प्रत्येक नागरिकाने प्रेम करावे. दौडीचा हा उपक्रम संपूर्ण देशभरात व्हावा यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु असल्याचे किरण गावडे यांनी सांगितलेशिवाजी उद्यानापासून सुरु झालेली ही दौड, हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, एसपीएम रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्री नगर, गुडशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर आठल्ये रोड, महाद्वार रोड, माणिकबाग रोड, समर्थ नगर, संभाजी गल्ली, एसपीएम रोड मार्ग जाऊन, कपिलेश्वर मंदिरात दौडीची सांगता करण्यात आली. अगदी पहाटेपासून सुरु झालेल्या या दौडीच्या पहिल्याच दिवशी धारकऱ्यांचा प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद लाभला.