बेळगाव : बेळगावच्या सुवर्णसौध येथे उद्या सोमवारपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याच्या माध्यमातून प्रत्युत्तर देण्यात येत आहे. महामेळाव्यासाठी गेल्या सप्ताहभरापासून शहर आणि तालुक्यात समितीचे कार्यकर्ते जनजागृती करत आहेत. दरम्यान टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपो मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याची पोलीस प्रशासनाने विशेष दखल घेतली आहे.
उद्या होणार्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याच्या निमित्ताने आत्तापासूनच पोलिसांनी बंदोबस्ताचे नियोजन सुरू केले आहे. व्हॅक्सिन डेपोकडे जाणार्या मार्गांवर बॅरिकेट्स टाकण्यात आले आहेत. व्हॅक्सिन डेपो परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात येत आहे.
