Wednesday , May 29 2024
Breaking News

आम.अंजली निंबाळकरांच्या संघर्ष पदयात्रेतून विकासकामांचा पूल साकारणार का ?

Spread the love

 

खानापूर : विकासापासून कोसो दूर असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील विकास कामासंदर्भात विद्यमान सरकारने घेतलेल्या उदासीन भूमिके विरोधात आम. अंजली निंबाळकर यांनी आज 12 डिसेंबर रोजी भाजप सरकारला जाग आणण्यासाठी चलो सुवर्णसौधचा नारा दिला आहे. दरम्यान आमदार निंबाळकर यांची पदयात्रा राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजपने नेत्या डॉक्टर सोनाली सरनोबत यांनी केला आहे. आमदार निंबाळकर यांच्या पदयात्रेवरून राजकीय धुळवड सुरू झाली आहे. याचवेळी जिल्ह्यातील सर्वाधिक पावसाचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खानापूर तालुक्यातील दुर्गम भागातील आमगावातील गावकऱ्यांना आमदार निंबाळकर यांच्या पदयात्रेतून आपल्या गावचा विकास होईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आमगावची लोकसंख्या सुमारे साडे सहाशेच्या आसपास आहे. चिखले गावाहून आमगावला जाण्यासाठी तब्बल साडेसहा किलोमीटरचा रस्ता दाट जंगलातून जातो. या मार्गावर बैल नदी लागते. या नदीवर पूर्वी साकव होते. सध्या तेथे फुटब्रिज बांधण्यात आला आहे. या फुटब्रीजवरुन ग्रामस्थांना ये-जा करावी लागते. मात्र चारचाकी जाण्यासाठी ब्रीज नसल्याने आरोग्याची समस्या, दूर्घटना आणि बिकट प्रसंगी काही घडल्यास त्याठिकाणी रुग्णवाहिका अथवा कोणतेच वाहन जाऊ शकत नाही.
पावसाळ्यात नदीला पाणी आल्यामुळे दोन ते तीन महिने या गावचा संपर्क तुटतो. चिखले गावाकडून आमगावकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपे वाढली आहेत. जंगली श्वापदांचा भीतीने जीव मुठीत धरुन गावकऱ्यांना पायपीट करावी लागते. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. मात्र, पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना जांबोटी अथवा खानापूरला जावे लागते. दोन वर्षांपूर्वी अतिवृष्टीने गावातील शाळा खोली कोसळली आहे. शाळा खोली बांधण्यासाठी तसेच बैल नदीवर पूल बांधण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र दोन्ही कामे सुरू झालेली नाहीत. पुलाचे काम वनखात्याच्या अडचणीमुळे रखडले आहे. उद्या 13 डिसेंबरपासून बेळगावच्या सुवर्ण सौध येथे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनात खानापूर तालुक्यातील समस्या आणि सर्वांगीण विकासाबाबत चर्चा व्हावी. यासाठी सरकारला जाग आणण्यासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी संघर्ष पदयात्रेची घोषणा केली आहे. आपल्या मतदारसंघातील शाळांची समस्या, शिक्षकांची कमतरता, बससेवा, पिण्याच्या पाण्याची समस्या, रस्ते, वीज, वन्य प्राण्यांमुळे होणारे पिकांचे नुकसान, ओला दुष्काळामुळे झालेले नुकसान, अनेक विकास कामात वनखात्याचा खोडा या महत्त्वाच्या विषयांवर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आम.अंजली निंबाळकर यांनी संघर्ष पदयात्रा काढणार असल्याची घोषणा केली आहे. आपल्या मतदार संघातील जनतेच्या अपेक्षांची पूर्तता करण्यात आमदार निंबाळकर साफ अपयशी ठरल्या आहेत. आमदार निंबाळकर यांची संघर्ष पदयात्रा राजकीय स्टंटबाजी असल्याचा आरोप भाजप नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला आहे. अशावेळी आमदार निंबाळकर यांच्या संघर्ष पदयात्रेतून खानापूर आणि आमगावातील जनतेला कोणता दिलासा मिळणार याचे उत्तर नजीकच्या काळात मिळणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेबैल टोलनाका मनमानी कारभाराविरोधात कॉंग्रेसचे रास्ता रोको आंदोलन

Spread the love  खानापूर : गणेबैल येथील टोलनाक्याच्या मनमानी कारभाराला कंटाळून येथील नागरिक, शेतकरी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *