खानापूर : शिव -स्वराज जनकल्याण फाउंडेशनतर्फ खानापुर येथील लोकमान्य भवन येथे १७ ते १९ नोव्हेंबर पर्यंत शिवकालीन शस्त्रांचे भव्य प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती शिव-स्वराज जन कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष निरंजन सरदेसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
शस्त्र प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देण्यासाठी बुधवारी शिवस्मारक येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अध्यक्ष सरदेसाई यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वी इतिहास रचला पण इतिहास निर्माण करताना असंख्य किल्ले जिंकून स्वराज्याची स्थापना केली. स्वराज्याची निर्मिती करताना मावळे तयार केले. स्वतःचे आरमार, सैन्य बळ तसेच शस्त्रास्त्रसाठा जमा केला शिवाजी महाराजांनी अनेक लढाया केल्या याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना व सर्वांना दिली जाते. पोवाडे, चित्रकला, चित्रफीत गडकिल्ल्यांचे दर्शन या माध्यमातून शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगितली जाते. परंतु स्वराज निर्माण करण्यासाठी शिवाजी महाराजांनी कोणत्या शस्त्रांचा वापर केला याची माहिती अनेकांना पूर्णपणे माहीत नाही यामुळे याची माहिती आजच्या पिढीला व शालेय विद्यार्थ्यांना देण्यासाठी शिव स्वराज्य जणकल्याण फाउंडेशनतर्फे दिवाळीचे औचित्य साधत शुक्रवार दि. १७ ते रविवार दि. १९ नोव्हेंबर पर्यंत दुर्गवीर प्रतिष्ठान मुंबई यांच्या सहकार्याने लोकमान्य भवन खानापूर येथे भव्य शस्त्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
बाळासाहेब शेलार यांनी शिव-स्वराज जन कल्याण फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार आहेत. तसेच युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत अशी माहिती दिली. रमेश धबाले यांनी शिव-स्वराज जन कल्याण फाउंडेशनच्या उद्घाटन कार्यक्रमासह आयोजित करण्यात आलेल्या शस्त्र प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर रहावे यासाठी जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती दिली. पत्रकार परिषदेला सुनिल पाटील, मुकुंद पाटील, मिलिंद देसाई, नागेश भोसले, संदेश कोडचंवाडकर, सुधिर नवलकर, दिग्विजय पाटील उपस्थित होते.