
बेळगाव : बेळगाव येथे होत असलेल्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठी भाषिकांनी महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्याही परिस्थितीत हा महामेळावा यशस्वी करण्यासाठी सीमाभागातील मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने सोमवार दिनांक 4 डिसेंबर रोजी वॅक्सिन डेपो येथे होणाऱ्या महामेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष मनोहर किणेकर यांनी केले.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर होते. मराठा मंदिर येथे गुरुवार दिनांक 30 रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले.
माजी आमदार मनोहर किणेकर पुढे म्हणाले की, १ नोव्हेंबर १९५६ रोजी मुंबई प्रांतातील मराठी बहुभाषिक भाग हा त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आला. येथील मराठी भाषिक आपल्या माय मराठी महाराष्ट्र राज्यात जाण्यासाठी अनेक आंदोलने करीत आहेत. साराबंदी, सत्याग्रह, निवेदने तसेच अनेक निवडणुका जिंकून केंद्र व राज्य सरकारला आपण महाराष्ट्रात जाणार आहोत याचा इरादा स्पष्ट केला आहे. २००४ रोजी महाराष्ट्र सरकारने हा सीमा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्यानंतर २००६ पासून कर्नाटक सरकारने वादग्रस्त सीमाभागात हिवाळी अधिवेशन भरवण्यास सुरुवात केली. हा वादग्रस्त भाग असताना येथे कोणतेही विधानसभेचे अधिवेशन घेण्यात येत नसते, परंतु सीमाभागावर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने हा कुटील डाव केला आहे व येथे सुवर्णसौध बांधून मराठी भाषिकाच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला आहे. २००६ पासून कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन होते. त्यावेळी येथील मराठी भाषिक महामेळावा घेऊन आपला तीव्र विरोध या अधिवेशनाला दाखवते व त्याचाच एक भाग म्हणून सोमवार दिनांक ४ डिसेंबर रोजी होणाऱ्या महामेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे व कार्यकर्त्यांनी आपापल्या गावांमध्ये, विभागांमध्ये जनजागृती करावी व मोठ्या संख्येने या महामेळाव्याला मराठी भाषिकांनी आपली उपस्थित रहावे.
यावेळी समिती नेते आर. एम. चौगुले, बी. डी. मोहनगेकर, चेतन पाटील, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र कुर्देमनीकर, मनोज पावशे, रामचंद्र मोदगेकर यांनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी मनोहर संताजी, दीपक पावशे, आर के पाटील, प्रसाद सडेकर, महादेव बिर्जे, नारायण कालकुंद्रीकर, कृष्णा हुंदरे, बी एस पाटील, संजय पाटील, नारायण सांगावकर आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta