बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने 4 डिसेंबर रोजी सकाळी 11.00 वाजता व्हॅक्सीन डेपो टिळकवाडी बेळगाव येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. जागेची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यांनी रविवार दिनांक 3 रोजी सकाळी 11.00 वाजता व्हॅक्सिन डेपो येथे जमावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात आले आहे. आज सकाळी बेळगाव पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात पोलीस अधिकारी व महाराष्ट्र एकीकरण समितीचे शिष्टमंडळ यांची बैठक होऊन मेळाव्याबाबत चर्चा झाली. यावेळी आयुक्त यांनी मेळाव्याला परवानगी देण्यात येणार नाही असे सांगितले. आपण जे काही म्हणता ते लेखी स्वरूपात द्या अशी मागणी शिष्टमंडळाने करताच आपण दोन तासात लेखी उत्तर पाठवतो असे त्यांनी सांगितले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोणतेही उत्तर नआल्याने समिती पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन समितीचा निर्णय घेतला. आजच्या शिष्टमंडळात कार्याध्यक्ष श्री. मनोहर किणेकर, सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, विकास कलघटगी, श्री. एम. जी. पाटील, श्री. गोपाळराव देसाई, श्री. गोपाळराव पाटील, श्री. बी. ओ. येतोजी यांचा समावेश होता.