बेळगाव : 4 डिसेंबरपासून बेळगावातील सुवर्णविधानसौध येथे हिवाळी अधिवेशन दहा दिवस चालणार आहे. कर्नाटक- महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या सुप्रीम कोर्टाच्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर बेळगाववर आपला हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकार हे हिवाळी अधिवेशन दर वर्षी बेळगावमध्ये भरवत आले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने मेळावा घेण्याचा निर्धार केला आहे.
या संदर्भात येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने या महामेळाव्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी शनिवार दिनांक 2-31-2023 रोजी येळ्ळूर येथे बैठकीचे आयोजन केले होते.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष शांताराम कुगजी उपस्थित होते.
येळ्ळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील, येळ्ळूर माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश बाळकृष्ण पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी नांदुरकर, रमेश मेनसे, जोतिबा चौगुले तसेच मनोहर सिद्दापा पाटील, मनोहर अण्णू पाटील आणि यल्लाप्पा कुगजी आणि येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी मराठी अस्मिता राखण्यासाठी कर्नाटक विधिमंडळ अधिवेशनाविरोधात आयोजित महामेळाव्याला जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला.