Saturday , September 7 2024
Breaking News

सीमाभागात मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी भाजपा गप्प का! : नाना पटोले

Spread the love

मुंबई : बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा काँग्रेस पक्ष निषेध करत आहे. सीमाभागात मराठी बांधवांची गळचेपी केली जात असताना कर्नाटकातील भाजपाचे सरकार बघ्याची भूमिका घेत असून मराठी भाषकांवरील हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाच्या एकाही नेत्याने निषेध करण्याचे सौजन्यही दाखवले नाही. भाजपचे हे मौन मराठी बांधवांचा अपमान करणारे असून हल्ल्याला त्यांची मूक संमती असल्याचे द्योतक आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, कर्नाटक विधानसभेचे अधिवेशन बेळगाव येथे सुरू होत असताना त्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी कन्नड रक्षण वेदिकेच्या गुंडांनी मध्यवर्ती एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकली.
दळवी यांच्यावरील हल्ला हा मराठी भाषकांवरील हल्ला असून हा अपमान व मराठी भाषकांची गळचेपी महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही. महाराष्ट्राची जनता दळवी व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. परंतु राज्यातील भारतीय जनता पक्षाचे चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर यांच्यासह एकाही नेत्यांनी या हल्ल्याचा साधा निषेधही केला नाही याचे आश्चर्य आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी माणसाची मतं मिळावीत म्हणून ‘मराठी कट्टा’ सुरु करता आणि मराठी भाषकांवरील सीमाभागातील हल्ल्याप्रकरणी गप्प बसता, ही दुतोंडी भूमिका मराठी लोकांच्या लक्षात आली आहे. भाजपाच्या या दुतोंडी भूमिकेला आता जनता पुरते ओळखून आहे.
कन्नड रक्षण वेदिकेच्या माध्यमातून मराठी भाषकांवर सातत्याने हल्ले केले जात आहेत. कर्नाटकातील भाजपा सरकारच्या आशिर्वादाशिवाय ही गुंडगिरी होऊ शकत नाही. या दडपशाहीला वेळीच आवार घालावा व राज्यातील भाजपा नेत्यांनी सीमाभागातील हल्ल्याप्रकरणी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

सुवर्णलक्ष्मी सोसायटीस अभिनेते प्रसाद पंडित यांची सदिच्छा भेट

Spread the love  बेळगांव : “आत्मीयता आणि स्नेह यांचा अभूतपूर्व संगम म्हणजे सुवर्ण लक्ष्मी सोसायटी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *