Sunday , July 13 2025
Breaking News

भ्याड हल्ल्याबाबत संसदेत आवाज उठवणार : खा. अरविंद सावंत

Spread the love

बेळगाव : मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याबाबत आपण संसदेत आवाज उठवून न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीच्या युवकांच्या शिष्टमंडळाने लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते खासदार अरविंद सावंत यांना नवी दिल्ली येथे प्रत्यक्ष भेटून केली आहे.
बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीचे अध्यक्ष संतोष मंडलिक, खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील आणि पियुष हावळ या समिती पदाधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने आज मंगळवारी सकाळी तडकाफडकी विमानाने नवी दिल्ली येथे रवाना होऊन लोकसभेतील शिवसेनेचे गटनेते अरविंद सावंत यांची प्रत्यक्ष भेट घेतली. तसेच महामेळाव्यादरम्यान घडलेल्या प्रकारांची माहिती देऊन उपरोक्त विनंतीचे निवेदन त्यांना सादर केले.
13 डिसेंबर रोजी बेळगावमध्ये आयोजित महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्यात दरम्यान कांही कानडी गुंडांनी पोलीस संरक्षणात मेळाव्याच्या ठिकाणी दाखल होऊन अनभिज्ञ असणार्‍या महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर शाई फेकून जो भ्याड हल्ला केला आहे. त्याच्या निषेधार्थ संपूर्ण सीमावासीयांमध्ये रोष असून सदर घटनेचा तीव्र निषेध सीमावासीय मराठी माणसांनी 14 डिसेंबर रोजी बेळगावसह सीमाभागातील प्रमुख ठिकाणी बंद पुकारून व्यक्त केला होता.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अध्यक्षांवर झालेला हल्ला हा एका व्यक्तीवर नसून महाराष्ट्राच्या अस्मितेवर असल्याने त्याचा निषेध देश पातळीवर होणे आवश्यक आहे. तरी याबाबत सध्या चालू असणार्‍या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आवाज उठवून सीमावासीयांवर सुरू असणारी ही कर्नाटक प्रशासनाची दडपशाही थांबविण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्रित प्रयत्न करावेत, अशी आम्हा सर्व सीमावासीय यांची नम्र विनंती आहे. याबाबत आपण योग्य तो निर्णय घ्याल असा आम्हाला विश्वास आहे, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदनाचा स्वीकार करून खासदार अरविंद सावंत यांनी समितीच्या शिष्टमंडळाची आस्थेने चौकशी केली आणि दळवी यांच्यावर झालेला हल्ला आणि कर्नाटक शासनाची दडपशाही याबाबत संसदेत जरूर आवाज उठवू, असे आश्वासनही दिले.

About Belgaum Varta

Check Also

कन्नड सक्तीच्या फतव्याविरोधात युवा समिती सीमाभागची बैठक

Spread the love  सीमाभागातल्या मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार बेळगाव : म. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *