
बेळगाव : सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी राज्य अतिथी व्याख्याता संघटनेच्या आदेशानुसार बेळगावात आज अतिथी व्याख्यात्यांनी आंदोलन केले. गेल्या अनेक वर्षांपासून सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालयांत अतिथी व्याख्याते म्हणून सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना अद्याप सेवेत कायम केलेले नाही. त्याशिवाय त्यांना सहा महिन्यांनी वेतन तेसुद्धा अपुरे दिले जाते. त्यात चरितार्थ चालवणे त्यांना कठीण झाले आहे. त्यामुळे समर्पक वेतनासह सेवासुरक्षा देण्याच्या मागणीसाठी राज्यात अतिथी व्याख्याते अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह धरत कर्नाटक राज्य अतिथी व्याख्याते संघटनेने येत्या 23 डिसेंबरपासुन राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात आज अतिथी व्याख्याते संघटनेतर्फे आंदोलन छेडण्यात आले. शहरातील चन्नम्मा चौकापासून अतिथी व्याख्यात्यांनी आज गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अतिथी व्याख्यात्यांना सेवासुरक्षा द्यावी, विविध सोयी-सुविधा द्याव्यात या मागणीच्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून तेथे निदर्शने करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगाव जिल्हा अतिथी व्याख्याते संघटनेचे अध्यक्ष डॉ. अडीवेप्पा इटगी यांनी सांगितले की, राज्यात गेल्या 15-20 वर्षांपासून हजारी अतिथी व्याख्याते अत्यल्प वेतनावर असुरक्षित वातावरणात काम करत आहेत. त्यांना सेवेत कायम करण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने केली तरी सरकार ठोस निर्णय घेत नाही. आम्ही सुवर्णसौध अधिवेशनावेळी 7 डिसेंबरला आंदोलन केले असता, शिक्षणमंत्र्यांनी भेट देऊन मागणीचा आढावा घेऊन परिशीलन करू अशी असमाधानकारक उत्तरे दिली. त्यामुळे आमच्या राज्य संघटनेने येत्या 23 डिसेंबरपासुन राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. प्रत्येक जिल्हा केंद्रावर आंदोलन करण्यात येणार आहे.त्याची पूर्वतयारी म्हणून आज मोर्चा काढून निदर्शने करण्यात येत आहेत. यापूर्वी 1994, 2003मध्ये तत्कालीन सरकारने अर्धवेळ शिक्षकांना सरकारी सेवेत सामावून घेत, विविध सुविधा दिल्या आहेत. त्याप्रमाणे आमच्याबाबतही निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी राज्य संघटनेच्या वतीने तुमकूर सिद्धगंगा मठ ते बेंगळुरपर्यंत पदयात्रा काढण्याचे नियोजन केले आहे. बेळगावात जिल्हा केंद्रावर होणाऱ्या आंदोलनात सुमारे 2 हजार अतिथी व्याख्याते सहभागी होणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.दरम्यान या आंदोलनात बेळगाव जिल्ह्यातील विविध सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालयातील अतिथी व्याख्याते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Belgaum Varta Belgaum Varta