
बेळगाव : कवठगीमठ कुटुंब तीन पिढ्यांपासून कृषी, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सेवा करत आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, संस्कृती आणि सहकार क्षेत्रात अधिक व्यापक काम करण्याच्या उद्देशाने 16 जानेवारी रोजी ‘महांतेश कवटगीमठ फौंडेशन’चा उद्घाटन सोहळा आयोजित केल्याचे माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी सांगितले.
बेळगावात आज पत्रकार परिषदेत बोलताना माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले की, आमचे कवटगीमठ कुटुंब हे गेल्या तीन पिढ्यांपासून कृषी, शिक्षण, सहकार, व्यवसाय आणि राजकारणात सक्रिय आहे. तोच वारसा चालवत आपणही समाजसेवक म्हणून कार्यरत आहे. माझ्या वाढदिवसानिमित्त 16 जानेवारी रोजी महांतेश कवटगीमठ फौंडेशनचे उद्घाटन होत आहे. सौंदत्ती केएलई एस. व्ही. बेळुब्बी कला आणि वाणिज्य महाविद्यालयात 16 जानेवारी रोजी हा समारंभ होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कवटगीमठ फौंडेशनची स्थापना आम्ही 5 उद्दिष्टांसह करणार आहोत. कवटगीमठ फौंडेशनचे शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्याचे उद्दिष्ट आहे. सुत्तूर क्षेत्राचे शिवरात्री देशिकेंद्र स्वामीजी, सिद्धगंगा मठाचे सिद्धलिंग स्वामीजी, गदगच्या तोंटदार्य मठाचे डॉ. सिद्धराम स्वामीजी, हुबळीच्या मुरुसाविर मठाचे डॉ. राजयोगींद्र स्वामीजी, इंचलचे शिवानंद स्वामीजी, पंचमसाली पीठाचे जयमृत्युंजय स्वामीजी, हुक्केरी हिरेमठाचे चंद्रशेखर स्वामीजी, नागनूर मठाचे डॉ. अल्लमप्रभू स्वामीजी, होसदुर्ग भगीरथपीठ येथील डॉ. पुरुषोत्तमानंदपुरी स्वामीजी यांच्या सानिध्यात हा कार्यक्रम होईल. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा ग्रंथ लोकार्पण करणार आहेत. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. केएलई संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे अध्यक्षस्थानी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला कवटगीमठ फौंडेशनचे पदाधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta