
बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संपूर्ण मराठी प्रदेश महाराष्ट्रात सामील व्हावा यासाठी १७ जानेवारी १९५६ रोजी झालेल्या आंदोलनात बेळगावमध्ये काही जणांनी हौतात्म्य पत्करले. या हुतात्म्यांना गेली ६७ वर्षे आपण १७ जानेवारी रोजी त्यांचे स्मरण करून त्यांच्या बलिदानाबद्दल अभिवादन करतो. या हुतात्म्यानी आपले सर्वोच्च बलिदान देऊन आम्हाला या लढ्यासाठी नवसंजीवनी दिली आहे. ६७ वर्षे झाली तरी सीमावासीयांना अजून न्याय मिळाला नाही. यामुळे येत्या १७ जानेवारीला बेळगाव व कंग्राळी खुर्द येथे सर्व सीमावासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, या हुतात्माना स्मरण करून हा हुतात्मा दिन गांभीर्याने पाळणे आमचे कर्तव्य आहे. नजीकच्या काळात हा सीमा लढा आम्ही तीव्र करून हा सीमाप्रश्नाची सोडवणूक करणे हीच या हुतात्मांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार तालुका म. ए. समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांनी केले.
मराठा मंदिर येथे शनिवार दिनांक १३ रोजी दुपारी झालेल्या तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत उपरोक्त विचार व्यक्त केले. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते.
तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे चिटणीस ऍड. एम. जी. पाटील यांनी प्रास्ताविक करून तालुका म. ए. समितीचे कार्यकर्ते यांची नावे वाचन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दोन मिनिटे मौन पाळण्यात आली.
यानंतर माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील म्हणाले की, सीमालढा लढत असताना केंद्र व राज्य सरकार आमच्यावर अनेक प्रकारे अत्याचार करत आहे. आता महाराष्ट्र सरकारने सीमा भागातील ८६५ खेड्यातील नागरिकांच्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले ही आरोग्य योजना मंजूर केली आहे. मंजूर करून केवळ काही दिवस झाले आणि याच्या कामकाजाला सुरुवात होताच, काही मूठभर कन्नड संघटनाच्या दबावाखाली सरकार म. ए. समितीचे कार्यकर्ते व या योजनेच्या कार्यालयाना नोटीसा पाठवून या योजनेमध्ये खेळ घालत आहे. तसेच सीमाभागातील अनेक दुकानांवरील मराठी पाट्यांना लक्ष करून सरकारी अधिकाऱ्यांच्या दबावाखाली कानडीकरण करण्याचा वरवंटा सध्या सीमाभागात सुरू आहे. मराठी भाषेवर कन्नडसक्ती होत आहे. हा उद्देश मराठी भाषिक कधीही खपवून घेतला जाणार नाही, आणि हे तुरंत न थांबल्यास येणाऱ्या दिवसात मराठी भाषिक हा लढा आपल्या खांद्यावर घेऊन या कन्नड सक्ती विरोधात जनआंदोलन उभे करतील. याची जबर किंमत राज्य सरकार व केंद्र सरकारला घ्यावी लागेल असा गर्भित इशाराही त्यांनी दिला.
यावेळी विनायक पाटील, प्रकाश अष्टेकर, शिवाजी खांडेकर, मनोहर संताजी, अशोक पाटील, चेतन पाटील, नारायण सांगावकर, मनोज पावशे, माजी जिल्हा पंचायत सदस्य रामचंद्र मोदगेकर, आर. एम. चौगुले, ऍड. राजाभाऊ पाटील, आदींनी आपले विचार व्यक्त केले.
यावेळी आर. आय. पाटील, बी एस पाटील, लक्ष्मण होनगेकर, अनिल पाटील, महादेव बिरजे, नारायण कालकुंद्री, अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. शेवटी सचिव एम. जी. पाटील यांनी या बैठकीत झालेले ठराव वाचन करून ते संमत झाल्यानंतर आभार प्रदर्शन केले. यानंतर बैठकीची सांगता करण्यात आली.
Belgaum Varta Belgaum Varta