बेळगाव (वार्ता) : राज्यातील बेरोजगार युवक-युवतींना एक तर रोजगार द्या किंवा दरमहा 9 हजार रुपये बेकार भत्ता द्या अशी मागणी कृती युवा काँग्रेसच्या वतीने बेळगावात आज भव्य आंदोलन करण्यात आले.
बेळगावात सुवर्णसौधमध्ये सुरु असलेल्या विधिमंडळ अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी युवा काँग्रेसने बेरोजगारीवर आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले. शब्द दिल्याप्रमाणे एक तर नोकर्या द्या किंवा दरमहा 9 हजार रुपये बेकार भत्ता द्या अशी मागणी करत युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुवर्णसौधसमोर जोरदार निदर्शने केली. राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचाही यावेळी निषेध करण्यात आला. बेळगावातील येडियुराप्पा मार्गावरून सुवर्णसौधपर्यंत युवा काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात निषेध मोर्चा काढला. या मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, युवा काँग्रेसच्या राज्याध्यक्षा रक्षा रामय्या, युवा नेते एन. हॅरिस यांच्यासह पक्षाचे अनेक नेते सहभागी झाले होते. ‘नो जॉब्स, नो व्होट’ असा मजकूर लिहिलेले फलक हाती घेऊन कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार म्हणाले, भाजपने निवडणुकीपूर्वी बेरोजगार युवकांना 2 कोटी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते देण्यात त्यांना अपयश आले आहे. त्यामुळे सरकारने एक तर बेरोजगार युवा वर्गाला रोजगार उपलब्ध करून द्यावा किंवा दरमहा 9 हजार रुपये बेकारी भत्ता द्यावा अशी मागणी त्यांनी केली. केंद्र सरकारने नोकर्या उपलब्ध करून दिल्या नाहीत तर पदवी प्रमाणपत्रे पंतप्रधान मोदी यांना पाठवा असे आवाहनही त्यांनी बेरोजगारांना केले. बेकार भत्ता देण्यासाठी सरकारकडे पैसा नाही तर त्यांनी आधी भत्ते घेणे बंद करावे, आपोआप त्यांना पैसा उपलब्ध होईल असे शिवकुमार यांनी सांगितले. या निदर्शनात राज्यातून आलेले युवा काँग्रेसचे पदाधिकारी, सदस्य सहभागी झाले होते.
