बेळगाव : बंगळूर येथे शिवपुतळा विटंबनाप्रकरणी बेळगावात शनिवारी सकाळपासून जमावबंदी आदेश जारी केला आहे. शुक्रवारी रात्री शहरात ठिकठिकाणी दगडफेक प्रकरणी तीन गुन्हे दाखल झाले असून २७ जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दोन दिवसांपूर्वी बंगळूर येथे शिवपुतळ्याची विटंबना झाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. शुक्रवारी रात्री याचे पडसाद बेळगावात उमटले. रात्री दहाच्या सुमारास शेकडो युवक धर्मवीर संभाजी चौकात जमून आंदोलन केले. यावेळी काही वाहनांवर दगडफेक झाली. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत संपूर्ण शहरात जमावबंदीचे आदेश दिले आहेत.
खडेबाजार, कॅम्प व मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही ठिकाणी वाहने व इमारतींवर दगडफेक झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. यामुळे पोलिसांनी तिन्ही ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. याप्रकरणी २७ जणांना अटक केली असून, आणखी संशयितांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.