बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमांचा आढावा खालील प्रमाणे
लेखक आपल्या भेटीला
दि. 15 जानेवारी रोजी लेखक आपल्या भेटीला या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी बेळगाव मधील प्रतीत यश लेखक कथाकार प्रा. सुभाष सुंठणकर यांच्याशी विद्यार्थ्यांनी गप्पाटप्पा केल्या सुभाष सुंठणकर यांनी साहित्याचे लेखन कसे करावे विद्यार्थ्यांनी साहित्याविषयी आवड कशी जोपासावी याविषयी मार्गदर्शन केले.
विज्ञान कथा सादरीकरण
वैज्ञानिक कथा सादरीकरण या अंतर्गत श्रीम. सोनाली बिर्जे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.. वैज्ञानिक कथांचे वाचन, लेखन कसे करावे व कथाकथनाची आवड कशी जोपासावी याविषयी सांगून कथांचे सादरीकरण केले.
स्वरचित कवितांचे सादरीकरण
भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या कवितांचे सादरीकरण करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात आली. बेळगाव परिसरातील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेऊन स्वतः तयार केलेल्या वेगवेगळ्या कवितांचे सादरीकरण केले. यासाठी कवयित्री हर्षदा सुंठणकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून कवितांचे सादरीकरण व लेखन कसे करावे याविषयी सांगितले.
गोष्टरंग
गोष्ट हा विद्यार्थ्यांचा आवडता विषय. विद्यार्थ्यांना गोष्टींचा आनंद लुटता यावा यासाठी प्रबोधिनी तर्फे गोष्टरंग या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.. मराठी विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी व नाट्यकलाकार शिवराज चव्हाण व अंकिता पवार यांनी गोष्टींचे अभिनयासह सादरीकरण केले.
सर्व कार्यक्रमांना प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओऊळकर यांचे प्रोत्साहन लाभले. तर बी. बी. शिंदे, इंद्रजित मोरे, नीला आपटे, गौरी ओऊळकर, हर्षदा सुंठणकर, एन. सी. उडकेकर, गजानन सावंत, माया पाटील, प्रसाद सावंत, धीरजसिंह राजपूत व बाळकृष्ण मनवाडकर यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.