
बेळगाव : येथील कंग्राळ गल्लीतील जिजाऊ महिला मंडळाच्या वतीने तिथीप्रमाणे राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या भक्ती भावाने साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शिवाजीराव गौन्डाडकर व माजी महापौर श्री. मालोजी अष्टेकर उपस्थित होते. सौ. शालन ज्योतिबा चौगुले यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. पंच श्री. गोपाळ सांबरेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. याप्रसंगी पंचमंडळातील श्री. बाबुराव कुट्रे, श्री. दौलत मोरे, ज्येष्ठ नागरिक श्री. अनंतराव पाटील, कुमार सूनगार, महिला मंडळाच्या सदस्या अंजनाताई शंभूचे, रेणुका कोकितकर, सविता कंग्राळकर, लक्ष्मी उसूळकर, उज्वला मोरे, वर्षा इंगोले, सुलोचना शेट्टी, अक्काताई शंभूचे, आनंदाबाई काटकर, इत्यादी उपस्थित होते.
सुरुवातीस श्रीमती अनिता शंभूचे यांनी प्रास्ताविक करून मंडळाच्या कार्याची माहिती दिली. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर फोटो पूजन करण्यात आले. वीणा उंद्रे आणि भगिनींनी जिजाऊ मातेचा पाळणा सादर केला. यावेळी श्री. शिवाजी गौन्डाडकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या जीवनातील अनेक प्रसंगाद्वारे आपण हिंदू धर्माचे रक्षण करणे कसे आवश्यक आहे आणि त्यांचे गुण कसे अंगीकारले पाहिजेत याचे सुंदर विवेचन केले. शिवाजी महाराजांचा जयजयकार करणे सोपे आहे परंतु त्यांचे विचार पचविणे कठीण आहे असे ते म्हणाले.
श्री. मालोजी अष्टेकर यांनी जिजाऊ मातेने ज्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांवर संस्कार केले. त्या कठीण काळाचे वर्णन करून या प्रसंगात त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरक शक्ती कशा झाल्या याचे वर्णन केले. शिवाजी महाराजांचे हिंदुत्व कसे होते याचे विवेचन करून महाराजांचे सैनिक म्हणून आपण कसे वर्तन करणे आवश्यक आहे याचे विवेचन त्यांनी केले.
सौ. नीलम बडवानाचे यांनी सर्वांचे आभार मानले. कुमारी ज्योती सुतार हिने संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
Belgaum Varta Belgaum Varta