बेळगाव : केरेगोडू गावात रामभक्तांनी फडकवलेला अंजनेय ध्वज राज्य सरकारने काढून टाकला आणि त्याच ठिकाणी पोलिसांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाचा अवमान केला, असा आरोप राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी यांनी केला. बेळगावजवळील एमके हुबळी आणि मंड्या जिल्ह्यातील केरेगोडू गावात भगवे ध्वज आणि श्रीरामाचे पोस्टर काढून टाकल्याच्या निषेधार्थ बेळगाव जिल्हा भारतीय जनता पक्षातर्फे बेळगावातील चन्नम्मा चौकामध्ये निदर्शने करून सरकारच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले.
यावेळी बोलताना राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी म्हणाले की, केरेगोडू गावात रामभक्तांनी फडकवलेला अंजनेय ध्वज राज्य सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी काढून टाकला आणि त्याच ठिकाणी राष्ट्रध्वज फडकावला. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाला. बेळगाव जिल्ह्यातील एम.के. हुबळी येथे राज्य सरकारच्या सूचनेनुसार पोलिसांनी भगवा ध्वज काढून टाकून तेथील कार्यकर्त्यांना शिवीगाळ केली. कर्नाटक भारतीय जनता पार्टी याचा निषेध करते. सरकारला रोखण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके म्हणाले की, एमके हुबळी आणि मंड्या जिल्ह्यातील केरेगोडू गावात भगवा ध्वज आणि श्रीरामाचे पोस्टर कडून टाकण्याच्या घटनांचा भारतीय जनता पक्ष तीव्र निषेध करतो. अशा घटनांतून सरकार जनतेचे लक्ष विकास कामापासून अन्यत्र वळवित असल्याचा आरोप त्यांनी केला.
माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, जिथे जिथे काँग्रेसचे सरकार आहे तिथे एक समाज दुसऱ्या समाजावर अत्याचार करतो. एमके हुबळी आणि मंड्या जिल्ह्यात भगवा ध्वज आणि श्री रामाची पोस्टर्स हटवण्यात आल्याचे कृत्य निषेधार्ह आहे, असे ते म्हणाले.
यावेळी खासदार मंगल अंगडी, प्रवक्ते एम. बी. जिरली, उज्वला बडवण्याचे, जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, महानगर जिल्हाध्यक्षा गीता सुतार, जिल्हा सरचिटणीस संदीप देशपांडे, दादागौडा बिरादार, मनपा सत्तारूढ गटनेते राजशेखर डोनी, नगरसेवक गिरीश धोंगडी, हणमंत कोंगाळी, प्रमोद कोचेरी, मल्लिकार्जुन मादमनवर, पी. एस. सिद्दनगौडा, नितीन चौगुले, संतोष देशनूर, महादेव राठोड, लीना टोप्पण्णावर, विनय कदम, महांतेश वकुंद आंदोलनात सहभागी झाले होते.