बेळगाव (वार्ता) : ’येथील पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला गेल्या आर्थिक वर्षात 95 लाख 84 हजार रुपयाचा निव्वळ नफा झाला असून बँकेकडे 94 कोटी 14 लाखांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. कोरोनामुळे सर्वत्र घडी विस्कटली असली तरीही बँकेने आपल्या प्रगतीचा आलेख कायम ठेवला आहे’ अशी माहिती पायोनियर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी बोलताना दिली.
बँकेची 115 वी वार्षिक सभा ऑनलाइन पद्धतीने शनिवारी संपन्न झाली. त्याप्रसंगी त्यांनी वरील प्रमाणे माहिती दिली.
प्रारंभी गेल्यावर्षी झालेल्या 114 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. अनिता मूल्या यांनी वाचून दाखवल्यावर ते कायम करण्यात आले. त्यानंतर 2020-21 सालाचा अहवाल, नफा तोटा, ताळेबंद पत्रक यांचे वाचन करून मंजुरी देण्यात आली. ऑडिट रिपोर्ट आणि बँकेने तयार केलेला दुरुस्ती रिपोर्ट यांचे वाचन करून परीशिलण करण्यात आले. नवीन वर्षासाठी ऑडिटरची नेमणूक, मागील सालाच्या अंदाजपत्रकास मंजुरी व बजेट पेक्षा जास्त झालेल्या खर्चास मंजुरी देण्यात आल्यावर आगामी सालच्या अंदाजपत्रकावर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. निव्वळ नफा याची विभागणी आणि राखीव निधी व इतर निधीबाबतही या बैठकीत मंजुरी देण्यात आली. बँकेने नवीन केलेले सभासद व कमी झालेले सभासद यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर अनेक वर्षापासून थकबाकी असलेल्या जुन्या कर्जांचे एक वेळी निकालात काढणेबाबत (वन टाइम सेटलमेंट) चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
गेल्या आर्थिक वर्षाच्या उलाढालीबाबत माहिती देताना चेअरमन श्री. अष्टेकर यांनी सांगितले की,’ बँकेचे भाग भांडवल 2 कोटी 9 लाख 8 हजार झाले असून राखीव निधी 16 कोटी 27 लाख 9 हजार, ठेवी 94 कोटी 14 लाख, कर्जे 66 कोटी 99 लाख, गुंतवणूक 40 कोटी 46 लाख, खेळते भांडवल 114 कोटी 38 लाख असून ढोबळ नफा एक कोटी 32 लाख 84 हजार रुपये तर निव्वळ नफा 95 लाख 84 हजार रुपये झाला आहे. बँकेच्या मुख्य शाखेसह शहापूर, गोवावेस आणि मार्केटयार्ड शाखा व्यवस्थित कार्य करीत असून लवकरच आणखी काही शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही चेअरमन श्री. प्रदीप अष्टेकर यांनी दिली.
ऑनलाइन पद्धतीने झालेल्या या सभेत अनेक सभासदांनी भाग घेतला. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना चेअरमननी उत्तरे दिली. व्हाईस चेअरमन श्री. रणजीत चव्हाण-पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.
याप्रसंगी सर्वश्री अनंत लाड, शिवराज पाटील, गजानन पाटील, रवी दोडन्नवर, सौ. सुवर्णा शहापूरकर, सौ. लक्ष्मी कानूरकर, श्री. सुहास तरळे, गजानन ठोकणेकर व विद्याधर कुरणे आदी संचालक उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत त्या सर्वांनी भाग घेतला आणि सभा खेळीमेळीत पार पडली.
Check Also
इस्कॉनतर्फे राधाष्टमी 11 सप्टेंबरला साजरी होणार
Spread the love बेळगाव : येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ (इस्कॉन)च्या वतीने यंदा राधाष्टमी बुधवार …