बेळगाव (वार्ता) : मुलांच्या आरोग्याची व सर्व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी सर्व महिला घेत असतात. महिलांनी मुलांच्या आरोग्याबरोबर आपल्याही आरोग्याची काळजी घ्यावी, असे उद्गार इंडियन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षा डॉ. राजश्री अनगोळ यांनी काढले.
तारांगण व संजना मेहंदी डिझायनर तर्फे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रेसिडेंट डॉ. राजश्री अनगोळ यांचा सत्कार समारंभ व शिल्पा राजपुरोहित यांचे केक कुकीज बनविण्याचे प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम सरस्वती वाचनालयाच्या सभागृहात आयोजित केला होता त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, महिलांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना सकस आहार दिला पाहिजे. आजकाल मोबाईलचा वापर लहान मुलांमधून खुप होत असल्यामुळे मुलांचे शारिरीक व्यायाम कमी होत चाललेत परिणामी मुलांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत. तसेच मुलांसोबत महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे आपल्या घरातील पदार्थामधूनच आपण रोजचा पौष्टिक आहार कसा घेतला पाहिजे.
व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका प्रा. स्वरुपा इनामदार, तारांगण संयोजिका अरुणा गोजे-पाटील, सत्कार मुर्ती डॉ. राजश्री अनगोळ, शिल्पा राजपुरोहित, ऋतुजा शिरूर उपस्थित होत्या.
प्रारंभी सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पाहुण्यांच्या हस्ते दिपप्रज्वलानंतर प्रा. मनिषा नाडगौडा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा.स्वरुपा इनामदार व अरुणा गोजे-पाटील यांच्या हस्ते रोपटे, शाल, सन्मान चिन्ह देवून डॉ. राजश्री अनगोळ यांचा त्यांच्या वैद्यकीय व सामाजिक कार्यातील योगदानाकरिता सत्कार करण्यात आला. त्यानंतर तारांगण केंद्र संचालिका नेत्रा मेणसे यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा. स्वरुपा इनामदार यांचे रोपटे देवुन स्वागत केले. सुधा मानगांवकर यांनी अरुणा गोजे-पाटील व सविता वेसणे यांनी शिल्पा राजपुरोहित यांचे रोपटे देवुन स्वागत केले.
कार्यक्रमाच्या सत्कार मुर्ती डॉ. राजश्री अनगोळ यांनी महिलांच्या आरोग्याविषयी बोलताना सांगितले की, महिलांनी व्यक्त होणे गरजेचे आहे तरच आपण सक्षम बनू असे बहुमोल मार्गदर्शन त्यांनी आपल्या भाषणातून केले. त्यानंतर प्रा. स्वरुपा इनामदार यांनी महिलांनी स्वत:च्या कलागुणांना जपल पाहिजे. प्रत्येकाकडे काहि ना काही कला असतात त्या त्यांनी जोपासल्या पाहिजेत, असे त्या कार्यक्रमात बोलत होत्या.
महिलांना शिल्पा राजपुरोहित यांनी खास नाताळच्या निमित्ताने घरच्या घरी टि केक व कुकीज बिस्किटे कसे बनविता येईल याचे अगदी सोप्या पद्धतीने प्रात्यक्षिक दाखविले. एकंदरीत कार्यक्रम खुप बहारदार झाला कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कवयत्री रोशनी हुंद्रे यांनी केले व आभार कवयत्री शितल पाटील यांनी मानले.