बेळगाव : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ज्येष्ठ व अनुभवी नेते शंकरगौडा पाटील यांना तिकीट द्यावे, अशी मागणी विविध संघटनांच्या नेत्यांनी केली आहे. ज्येष्ठ व अनुभवी नेते शंकरगौडा पाटील यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची मागणी अनेक संघ-संस्थांनी केली आहे. बेळगावात आज मंगळवारी या संघ-संस्थांच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली.
यावेळी बोलताना बांधकाम व इतर कामगार संघटनेचे संस्थापक-अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर म्हणाले की, बेळगावातील विविध संघटनांच्या नेत्यांनी प्रसारमाध्यमांसह स्थानिक समस्यांची जाण असलेल्या व कार्यकर्त्यांच्या समस्यांना प्रतिसाद देणाऱ्या स्थानिक उमेदवारांना तिकीट दिल्यास पक्ष संघटना वाढेल व भाजपला विजय मिळवता येईल. स्थानिक उमेदवारांना स्थानिक समस्यांची जाण असते, स्थानिक लोकांशी चांगला परिचय असतो. त्यामुळे लोकप्रतिनिधी व जनतेत सुसंवाद साधला जाऊन लोकांच्या समस्या सोडविण्यासही मदत होते. या दृष्टीने शंकरगौडा पाटील हे योग्य उमेदवार ठरतील. त्यांनी बेळगाव जिल्ह्यात भाजप पक्ष संघटना वाढविण्यात मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास भाजपला ही लोकसभा निवडणूक जिंकणे सोपे जाईल असे त्यांनी सांगितले.
विणकर नेते गुंडू मास्तमर्डी म्हणाले की, शंकरगौडा पाटील यांनी बुडा चेअरमन व अन्य पदांवर असताना बेळगाव दक्षिण मतदारसंघातील विणकर समाजाच्या कल्याणासाठी मोठे काम केले आहे. त्यामुळे विणकर समाज त्यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी दिल्यास, आम्ही सर्व विणकर त्यांच्या पाठीशी राहून बहुमताने त्यांना विजयी करू, असे सांगितले.
पत्रकार परिषदेत चंद्रकांत मजगी, एच. डी. काटवा, स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी, सामाजिक कार्यकर्ते मदनकुमार भैरप्पनावर, विजय पाटील, ऍड. किवडसन्नावर आदी उपस्थित होते.