
बेळगाव : मुंबई, बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी शिवसेनेने पुकारलेल्या चळवळीत आपल्या प्राणांची आहुती देऊन हौतात्म्य पत्करलेल्या निधड्या छातीच्या ६७ शिवसैनिकांना बेळगावात आज अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली. रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौक सिहगर्जना युवक मंडळ येथे आज गुरुवारी सकाळी गांभीर्याने हुतात्मा दिन पाळण्यात आला. महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि सिहगर्जना युवक मंडळाच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात तिन्ही संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व सदस्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र व पुष्पहार वाहून हुतात्मा शिवसैनिकांना अभिवादन केले.यावेळी बोलताना शिवसेना कोल्हापूर जिल्हा उपप्रमुख प्रभाकर खांडेकर म्हणाले की, सीमाप्रश्नाच्या चळवळीत काहीशी शिथिलता आली असली तरी, मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी प्राणांची बाजी लावलेल्या हुतात्म्यांचे स्मरण करून सीमाभागातील मराठी माणसाने एकसंघ राहून सीमाप्रश्नाची सोडवणूक करून घेणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी हुतात्म्यांच्या बलिदानाची जाणीव ठेवून एकत्र येऊन सीमाप्रश्नासाठी संघर्ष करावा असे आवाहन त्यांनी केले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे नेते शुभम शेळके म्हणाले की, कर्नाटक सरकार कोणत्या ना कोणत्या प्रकारे सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणसाला संपवण्याचे काम करत आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी शिवसेनेने ६७ हुतात्मे दिले, त्याचप्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समितीनेही अनेक हुतात्मे दिले आहेत. या सर्व हुतात्म्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून आपण सर्वांनी आगामी ५-६ वर्षांत जोर लावून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले पाहिजेत. अन्यथा येत्या ५-६ वर्षांत कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी माणूस संपवल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्र सरकारनेही उदासीनता सोडून सीमाभागातील मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन त्यांनी केले.
शिवसेना बेळगाव जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर म्हणाले की, मुंबई, बेळगावसह मराठी भाषिक सीमाभाग महाराष्ट्रात येण्यासाठी ६७ शिवसैनिकांनी हौतात्म्य पत्करले आहे. सीमाप्रश्नाची त्वरित सोडवणूक करून घेऊन सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करून घेणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. यासाठी सर्व मराठी भाषिकांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, खानापूरचे माजी आमदार दिगंबर पाटील, खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, खानापूरचे सरचिटणीस आबासाहेब दळवी, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, यल्लाप्पा मुचंडीकर, नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजी मंडोळकर, पिराजी शिंदे, सुनील अष्टेकर, शिवप्रतिष्ठानचे किरण गावडे, म. ए. युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, खानापूर युवा अध्यक्ष धनंजय पाटील, ऍड. अमर येळ्ळूरकर यांच्यासह महाराष्ट्र एकीकरण समिती, शिवसेना आणि मराठी भाषिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta