बेळगाव : कर्नाटक सरकारने जनतेला हमी योजनेचे आश्वासन दिले आणि सत्तेत आल्यानंतर ते राज्यात विकासकामे करत नाहीत, अर्थसंकल्पातील पैशाची चर्चा करून जनतेला आश्वासने द्यावीत पण काँग्रेस पक्षाने मोफत योजनेचे आश्वासन दिले आणि आज राज्य सरकार दिवाळखोर झाले आहे, असा आरोप भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या ‘मतदारांना उत्तर द्या’ अभियानाचा एक भाग म्हणून बेळगाव भाजप ग्रामीण मंडळचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी हेब्बाळकर यांच्या गृह कार्यालयास भेट देऊन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांना निवेदन देऊन शासनाकडून आणलेल्या अनुदानाची माहिती देण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना भाजप ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष धनंजय जाधव यांनी कर्नाटकातील ज्या मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत त्या मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांना तुम्ही जनतेला दिलेले आश्वासन आणि विकासासाठी दिलेल्या अनुदानाची माहिती द्या, असे सांगितले. जनतेला हमी योजना सांगून काँग्रेस सरकार सत्तेत आले, मात्र आता ते राज्यात कोणत्याही प्रकारे विकासकामे करत नाहीत. अर्थसंकल्पातील पैशाची तरतूद करून जनतेला आश्वासने द्यावीत. पण काँग्रेस पक्षाने नियमांना सोडचिठ्ठी देऊन आश्वासने दिली आहेत. त्यामुळे आज राज्य सरकार दिवाळखोरीत निघाले आहे. ग्रामीण मतदारसंघाचे आमदार सध्या सरकारचे मंत्री आहेत, पण विकासाची कामे झाली नाहीत. कोणत्याही गावात रस्त्याचे बांधकाम झालेले नाही. कामाबाबत नागरिकांकडून आक्षेप व्यक्त होत आहे. सरकारकडून त्यांनी किती अनुदान आणले, त्यातून कोणती विकासकामे केली, करणार आहेत याची माहिती देण्याची मागणी जाधव यांनी केली.मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृणाल हेब्बाळकर यांनी निवेदन स्वीकारल्यावर सांगितले की, आज भाजपच्या नेत्यांनी आमच्या कार्यालयाला भेट देऊन आमच्या आमदारांनी दिलेल्या अनुदानाची माहिती विचारली. अलीकडेच आमच्या मातोश्री मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आम्हाला 800 कोटींच्या अनुदानाची माहिती दिली. गेल्या वेळी राज्यात भाजपचे सरकार असताना त्यांच्या कारभारात कोणताही विकास झाला नाही, मात्र विरोधी पक्षात असून लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सर्वाधिक विकासनिधी मंजूर करवून घेत ग्रामीण मतदारसंघात अनेक विकासकामे केली आहेत. ग्रामीण मतदारसंघात भाजपने जनाधार गमावला आहे. भाजप लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ चर्चेत राहण्याच्या उद्देशाने पब्लिसिटी स्टंट करत आहे. अनेक योजना मतदारसंघातील जनतेला देण्यात आमचे आमदार यशस्वी झाले आहेत, असा दावा मृणाल यांनी केला.
यावेळी भाजप ग्रामीण मंडळचे सदस्य सहभागी झाले होते
Belgaum Varta Belgaum Varta