
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने आज सायंकाळी कोल्हापूर येथे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर सीमाप्रश्न आणि सीमाभागातील मराठी भाषिकांचे प्रश्न यासंदर्भात चर्चा केली. यावेळी महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री श्री. शंभूराज देसाई, उद्योग मंत्री श्री. उदय सामंत, श्री. भरत गोगावले, श्री. संजय राठोड, आमदार श्री. राजेश क्षीरसागर आणि महाराष्ट्रातील नेतेमंडळी उपस्थित होती. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा दावा गेली अनेक वर्षे प्रलंबित असून ऑक्टोबरमध्ये याची सुनावणी झाली परंतु तीन न्यायाधीशांचे बेंच नसल्यामुळे हा दावा जानेवारी महिन्यात घेण्यात येईल असे सांगण्यात आले होते पण आजपर्यंत या दाव्याची सुनावणी सुरू झालेली नाही आपण मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे ज्येष्ठ वकील आणि इतर लोकांशी संपर्क करून जावा लवकरात लवकर कसा सुरु होईल याकडे लक्ष द्यावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली. यावेळी आपण निश्चितपणे यात लक्ष घालू असे आश्वासन माननीय शिंदे साहेब यांनी दिले. सीमाभागातील मराठी माणसाला दररोज सहन कराव्या लागणाऱ्या अन्यायासंदर्भात यावेळी माहिती देण्यात आली. मराठी भाषा संस्कृती आणि लिपी नष्ट करण्याचे कार्य कर्नाटक सरकार करत आहे याकडे महाराष्ट्रने लक्ष द्यावे आणि कर्नाटक सरकारला याबाबतीत जशास तसे उत्तर द्यावे अशी विनंती शिष्टमंडळाने केली. महाराष्ट्राच्या उच्चाधिकार समिती व तज्ञ समिती यांच्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावांची ताबडतोब अंमलबजावणी करावी अशी विनंती ही यावेळी करण्यात आली. सीमाप्रश्नासंदर्भात नेमण्यात आलेल्या समन्वयकांना बेळगावात पाठवून द्यावे म्हणजे सीमा भागातील अनेक प्रश्नांची त्यांच्याबरोबर चर्चा होईल अशी विनंती यावेळी करण्यात आली. याबाबतीत आपण निश्चितपणे कारवाई करू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या या शिष्टमंडळात समितीचे सरचिटणीस श्री. मालोजी अष्टेकर, खजिनदार श्री. प्रकाश मरगाळे, तालुका चिटणीस श्री. एम. जी. पाटील, खानापूर महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष श्री. गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष श्री. निरंजन सरदेसाई, सरचिटणीस श्री. आबासाहेब दळवी, मध्यवर्ती समितीचे सदस्य श्री. विलासराव बेळगावकर, गोपाळराव पाटील, सुनील आनंदाचे व विनोद आंबेवाडीकर यांचा शिष्टमंडळात समावेश होता. लवकरात लवकर मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांबरोबर आपण एक बैठक आयोजित करू असे आश्वासन हे मुख्यमंत्र्यांनी दिले.
Belgaum Varta Belgaum Varta