
येळ्ळूर : हिंदवी स्वराज्य युवा संघटना व येळ्ळूर ग्रामस्थांच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज अश्वारूढ पंचधातु मूर्ती लोकार्पण सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र चौक येळ्ळूर या ठिकाणी रविवार (ता. 25) रोजी रात्री दहा वाजता सादर झालेल्या गीतराधाई उत्सवशाही या सांस्कृतिक मराठमोळ्या कार्यक्रमाने येळळूरवासिय जनतेची मने जिंकली, मराठमोळ्या लोकसंस्कृतीचा सुवर्णमय इतिहास सांगणाऱ्या या गीतराधाई उत्सवशाही कार्यक्रमात, विसरत चाललेल्या रूढी परंपरा, आत्ताची जीवन व्यवस्था आणि स्वराज्यकालीन जीवन व्यवस्था, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र यांची एक सांगेतिक आणि मनोरंजनात्मक सांगड घालण्यात आली होती, बळीराजाच्या पहाटेच्या ओवी भूपाळी पासून ते शेतकरी गीतापर्यंत अस्सल मराठी गीते, कोळी, धनगरी, आदिवासी, डोंबारी बांधव, आणि आराध्य दैवततांचा जागर, गोंधळ या कार्यक्रमात प्रामुख्याने दिसून आला. सुमधुर संगीत, बहारदार नृत्याविष्कार, हसून लोटपोट करणारा गावगाडा, भव्य दिव्य नैपथ्य, साक्षात शिवाजी महाराजांच्या नजरेतील महाराष्ट्र गीतराधाईच्या कलाकारांनी सादर करून येळ्ळूरवासीय शिवभक्त महिला भगिनी व बालगोपाळांची मने जिंकली. त्याचबरोबर येळ्ळूरकरांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त अशी साथ दिली. कार्यक्रम पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक महिला व बालगोपाळ उपस्थित होते. तत्पूर्वी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येळ्ळूर ग्रामपंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील हे होते, तर उद्घाटक म्हणून येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे व कार्याध्यक्ष प्रा. सी. एम. गोरल उपस्थित होते. कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संघटनेचे अध्यक्ष प्रशांत मजुकर, ग्रामपंचायत सदस्य दयानंद उघाडे, राकेश परीट, जोतिबा चौगुले, शिवाजी नांदुरकर, शांता काकतकर, रेणुका मेलगे, सुवर्णा बिजगरकर, तसेच कृष्णा हुंदरे, महादेव नंद्याळकर, विनोद पाटील यांच्या हस्ते झाले. परशराम मोटराचे, प्रा. सी. एम. गोरल व प्रमोद पाटील यांनी विचार मांडले. मान्यवरांचा सत्कार हिंदवी स्वराज्य युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आला, हिंदवी स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षक अनिल हुंदरे व दत्ता उघाडे यांनी केले. चांगदेव मुरकुटे यांनी शेवटी आभार मानले.
Belgaum Varta Belgaum Varta