येळ्ळूर : मराठी भाषा सुंदर व समृद्ध आहे, तसेच तिचा गोडवाही तितकाच आहे, तेव्हा प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे व ती भाषा समृद्ध करण्यासाठी व तिचे संवर्धन करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे, असे विचार अभियंते व अशादीप वेल्फेअर सोसायटीचे संस्थापक हणमंत कुगजी यांनी काढले. ते येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने श्री शिवाजी विद्यालय येळ्ळूर या ठिकाणी आयोजित मराठी भाषा दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर हे होते. प्रारंभी साहित्य संघाचे अध्यक्ष परशराम मोटराचे यांनी साहित्य संघाच्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. त्यानंतर अभियंते हणमंत कुगजी यांनी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन केले. मराठी भाषा दिनाचे औचित साधून अभियंते हणमंत कुगजी येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यानंतर साहित्य संघाच्या वतीने अभियंते हणमंत कुगजी व मराठी विषयाच्या शिक्षिका विद्या पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. विद्या पाटील यांनी सुद्धा मराठी भाषा आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याचे विवेचन केले, यावेळी परशराम मोटराचे, मुख्याध्यापक एम. बी. बाचीकर व प्रा. सी. एम. गोरल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी साहित्य संघाचे सचिव डॉ तानाजी पावले, उपाध्यक्ष परशराम बिजगरकर, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, अमोल जाधव, शिक्षक संजय मजूकर, एच. एस. लोकळूचे, एस. पी. मेलगे, एम. बी. पंथर, रेखा पाटील, व्ही व्ही पटील, ए. व्ही. कोली, श्रीमती रेणुका राऊत, श्रीमती निर्मला कंग्राळकर यांच्यासह शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी. एम. गोरल यांनी केले, तर आभार शिक्षक संजय मजुकर यांनी मानले.