रयत संघटनेचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
निपाणी (वार्ता) : राज्यातील सरकारने अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. पण एकाही शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाईची रक्कम दिलेली नाही. आता मार्च एंडच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या कर्जाची सक्तीने वसुली केली जात आहे. ही वसुली तात्काळ न थांबवल्यास रयत संघटनेतर्फे बँकांच्या समोर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार यांनी दिला. बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.
शेतकऱ्यांच्या कर्जाची वसुली मे महिन्यापर्यंत करू नये. आयटी रिटर्न असले तरच शेतकऱ्यांना कर्ज दिले जाते. त्याची सक्ती करू नये. १ लाख १४ हजार रुपयांच्या कर्जापर्यंत सोसायट्यांनी बोजा चढवू नये. याशिवाय शेतकऱ्यांना जामीन असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याचे उसाचे बिल कट करू नये. कोरे धनादेश आणि मुद्रांक घेऊ नयेत. अनेक शेतकऱ्यांना राजकारणामुळे शेतीसाठी कर्ज मंजूर होत नाही. असा दुजाभाव करू नये. शेतकऱ्यांच्या कर्ज इतकेच मालमत्तेवर बोजा चढवावा. या नियमांची अंमलबजावणी न केल्यास शेतकऱ्यासह बँकासमोर आंदोलन छेडले जाईल, असेही पोवार यांनी सांगितले.
पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी सहकारी संस्था, पतसंस्था आणि बँकांनी तीन महिन्यापर्यंत शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची कर्जाची वसुली करू नये, याबाबत सर्व अधिकारी व व्यवस्थापकांना सूचना केल्या
बैठकीस आमदार राजू शेठ, चन्नाप्पा पुजारी, प्रकाश नाईक, बाबासाहेब पाटील, आशा एम. मधुकर पाटील, सुरेश परगन्नावर, आप्पासाहेब पाटील, किसन नंदी, कुमार तिगडी संजू हब्बनावर यांच्यासह जिल्हाधिकारी, सहकार खात्याचे निबंधक, बँकांचे व्यवस्थापक, अधिकारी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.