
बेळगाव : पाणी समस्या सोडविण्यात अग्रेसर असलेल्या प्यास फौंडेशनने आता बेळगावच्या कॅम्प परिसरात तलाव निर्माण करण्याचे आणखी एक विधायक काम हाती घेतले आहे.
बेळगावच्या कॅम्प परिसरातील धोबीघाटमध्ये 2.5 एकर जागेत भव्य तलाव निर्माण करण्यास प्यास फौंडेशन पुढे सरसावले आहे. बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्ड, मेत्राणी बंधू यांच्या स्नेहम टेपिंग सोल्युशन्स आणि सक्षम फौंडेशन यांच्या सहयोगाने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. आज शुक्रवारी सकाळी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर या प्रकल्पासाठी भूमिपूजन करण्यात आले. मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कमांडंट व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, प्यास फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू, स्नेहम टेपिंग सोल्युशन्सचे मेत्राणी बंधू आदी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तलावासाठी भूमिपूजन करण्यात आले.
यासंदर्भात माहिती देताना प्यास फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. माधव प्रभू यांनी सांगितले की, बेळगाव परिसरात तलाव पुनर्भरणाचे 13 प्रकल्प यशस्वीपणे पूर्ण केले आहेत. हा आमचा चौदावा पण तलाव निर्माणाचा पहिला प्रकल्प आहे. बेळगावात गेल्या अर्धशतकातील तलाव निर्मितीचा हा पहिलाच प्रकल्प आहे. धोबीघाट येथील 2.5 एकर जागेत 15 फूट खोल खोदाई करून भव्य तलाव निर्माण करण्यात येणार आहे. तसेच 1 एकर जागेत एक बेट तयार करून तेथे व तलावाच्या बाजूने झाडे लावणार आहोत. स्नेहम टेपिंग सोल्युशन्सचे अनिश आणि सुनीश मेत्राणी बंधूंनी यासाठी सीएसआर फंडातून आर्थिक साह्य केले आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी 2 महिने लागतील. पुढील वर्षी तलावाभोवती पेव्हर्स बसवण्यात येतील. संपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास 2 वर्षे लागतील. येत्या पावसाळ्याआधी तलाव खोदाई पूर्ण होऊन पावसाचे पाणी साठविण्यास सुरवात करण्यात येईल. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागात नवीन तलाव खोदाईचा हा पहिलाच प्रकल्प प्यास फौंडेशनतर्फे राबविण्यात आला आहे.
यावेळी बोलताना मराठा लाईट इन्फन्ट्रीचे कमांडंट व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी म्हणाले की, आज महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर तलाव निर्मिती कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे अंतर्जल पातळी वाढून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कॅम्प परिसरातील पाणीसमस्या संपुष्टात येण्यास मदत होणार आहे. त्यासाठी बेळगावचे मान्यवर, जबाबदार नागरिक पुढे आले आहेत, ही समाधानाची बाब आहे. लवकरच तलाव खोदाईचे काम पूर्ण होऊन येथे हिरवागार, रमणीय परिसर निर्माण होईल, पक्ष्यांची किलबिल ऐकायला मिळेल आणि हे स्थळ एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल, असे सांगून त्यांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ राजीवकुमार, स्नेहम टेपिंग सोल्युशन्सचे अनिश आणि सुनीश मेत्राणी बंधू, प्यास फौंडेशनच्या सचिव डॉ. प्रीती कोरे, अवधूत सामंत, सतीश लाड, सूर्यकांत हिंडलगेकर, रोहन तसेच सक्षम फौंडेशनचे सदस्य आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अधिकारी उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta