
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना पळालेल्या आणि रस्त्यावर असहाय्य जीवन जगणाऱ्या एका मनोरुग्ण भिक्षुकाच्या मदतीला धावून जात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची घटना आज गुरुवारी सकाळी घडली.
याबाबतची माहिती अशी की, आज सकाळी सीपीएड कॉलेज रस्त्यावर मनोरुग्ण असलेला एक भिक्षुक इसम असहाय्य अवस्थेत असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते ॲलन विजय मोरे, अवधूत तुडवेकर, सौरभ स्वांत, आतिश धातोंबे आणि साईराम जहागीरदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी संबंधित भिक्षुक मनोरुग्ण असल्याचे आणि त्याच्या पायाच्या जखमेत कृमी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच यापूर्वी तो भिक्षुक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना तेथून पळाल्याची माहितीही उपलब्ध झाली. दरम्यान पोलीस आणि रुग्णवाहिकेलाही पाचारण करण्यात आले. त्यानंतर कोणताही संकोच न करता समर्पित वृत्तीने सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या मनोरुग्ण भिक्षुक इसमाला पुन्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली. त्याचप्रमाणे त्याची गंभीर स्थिती लक्षात घेऊन हॉस्पिटलमधील डॉक्टरांना भिक्षुकाचा पाय वाचवण्यासाठी तातडीने आवश्यक ते उपचार करण्याची विनंती सामाजिक कार्यकर्ते ॲलन मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. रस्त्यावरील असहाय्य भिक्षुकाच्या मदतीला धावणाच्या या सामाजिक कार्यकर्त्यांच्या कृतीचे कौतुक होत आहे.
Belgaum Varta Belgaum Varta