बेळगाव: कर्नाटक सरकारच्या अन्यायविरुध्द लढा देण्यासाठी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची मंगळवार दिनांक ३० एप्रिल रोजी बेळगाव येथे जाहीर सभा होणार आहे.
सीमाभागातील मराठा समाज व मराठी भाषिकावर होणाऱ्या अन्यायाची जाणीव मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना द्यावी म्हणून सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवार दिनांक १६ रोजी अंतरवाली सराटी येथील आंदोलनस्थळी माजी आमदार मनोहर किनेकर, ऍड. अमर येळ्ळूरकर, विकास कलघटगी, मनोहर संताजी यांनी भेट घेऊन, सीमाप्रश्न व सीमाभागातील मराठी भाषिक, मराठा समाजावर होणाऱ्या अन्याय, अत्याचार संदर्भात सखोल चर्चा करून माहिती दिली.
मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सीमाप्रश्नाची मला जाणीव आहे, म्हणून आम्ही सकल मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये सीमाप्रश्नाचा समावेश केला असून मराठी भाषिकांच्या व मराठा समाजाच्या अन्यायाविरुद्ध सर्व मराठी भाषिकांना, मराठा समाजाला एकत्रित करून सरकारला जाब विचारणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी येत्या ३० तारखेला बेळगाव येथे आपण सर्व मराठा समाज व मराठी भाषिकांना एकत्रित करून भारताच्या पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सीमाप्रश्न व मराठी भाषिकांवर, होणाऱ्या अन्यायाची दखल घेण्यास भाग पाडू व सीमाभागातील मराठा समाज व मराठी भाषिकांना न्याय देऊ असे विचार त्यांनी व्यक्त केले.