बेळगाव : निवडणूक प्रचाराच्या भांडणातून महाराष्ट्र एकिकरण समितीच्या दोघा कार्यकर्त्यांवर हल्ला करणाऱ्या पाचजणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्यावर खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
अटक केलेल्या संशयितांमध्ये शुभम महादेव पोटे (वय २४), श्रीराम ऊर्फ लोन्या महादेव पोटे (वय २५, दोघेही रा. कचेरी गल्ली, शहापूर), अजय महादेव सुगणे (वय २९, रा. रामदेव गल्ली, वडगाव), बाळकृष्ण ऊर्फ किशन मारुती मंडोळकर (वय २३, रा. हट्टीहोळी गल्ली, शहापूर) व मंगेश ऊर्फ सोन्या यशवंत कित्तूर (वय २२, रा. आनंदवाडी, शहापूर) यांचा समावेश आहे. मनोज जरांगे-पाटील यांच्या सभेची जागृती करताना राष्ट्रीय पक्षाच्या काहींनी दोघांना मारहाण केल्याची घटना शनिवारी रात्री घडली होती. यामध्ये सुंदर शांताराम केळवेकर (वय ३२) व सचिन शांताराम केळवेकर (वय ३६) या दोघा भावांवर चाकू व रॉडने हल्ला केला होता. तसेच आणखी एक भाऊ नितीन केळवेकर व आई लक्ष्मी केळवेकर यांनाही धक्काबुक्की केली होती. सोमवारी या प्रकरणातील पाचजणांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची कारागृहात रवानगी केली. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर तिगडी तपास करीत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta